औंध-बाणेर परिसरात १४ हजार ११२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या जाणाऱ्या निरोप

औंध : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय आणि पर्यावरणपूरक वातावरणात झाली. मुळा नदीवरील बालेवाडी-बाणेर येथील विसर्जन घाटासह पाषाण येथील वाकेश्वर मंदिर घाट आणि सोमेश्वर मंदिर घाट येथे विविध मंडळांच्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, एकूण १४ हजार ११२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये लोखंडी टाक्यांमध्ये ११ हजार २२७ मूर्तींचे विसर्जन, तर २ हजार ८८५ मूर्ती संकलित करण्यात आल्या. बांधलेल्या हौदात विसर्जित झालेल्या मूर्तींची संख्या शून्य असल्याची नोंद आहे. दरम्यान, या कालावधीत तब्बल १६ हजार १७१ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुकांमध्ये पारंपरिक ढोल-ताशा पथकांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याचे चित्र औंध-बाणेर-बालेवाडी, पाषाण आणि परिसरात पाहायला मिळाले. कर्णकर्कश डीजेला तुलनेने दूर ठेवत अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाला निरोप दिला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन घाटांवर आवश्यक विद्युत व्यवस्था, जीवितरक्षकांची नियुक्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बालेवाडी-बाणेर परिसरात राहुलदादा बालवडकर फाउंडेशन आणि जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली होती.

नदी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांचा प्रतिसादही उल्लेखनीय राहिला. या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी नदीमध्ये मूर्ती विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

गणेशोत्सवाच्या सांगतेवेळी भक्ती, पारंपरिक संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम औंध-बाणेर परिसरात पाहायला मिळाला.

See also  पुण्यातील ढोल ताशा पथकांसाठी सरावासाठी पुणे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी भाजपा शहराध्यक्षांची मागणी