पुणे : सुसज्ज रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा, डॉक्टरांचा आणि स्वयंसेवकांचा ताफा अशा तयारीनिशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ने सलग ३२ तास वैद्यकीय सेवा पुरविली, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज (रविवारी) दिली.
वैद्यकीय सेवेसाठी १५ जणांचे वैद्यकीय पथक होते. तसेच ५ रुग्णवाहिका, २ कॉर्डिॲक रुग्णवाहिका आणि औषध वाटपासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका अशी यंत्रणा कार्यरत होती. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक ते डेक्कन जिमखाना येथील पांचाळेश्र्वर घाट या मार्गावर ही सेवा तैनात ठेवली होती. ३५ रुग्णांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकेचा लाभ मिळाला आणि ३६७ भाविकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. ट्रस्ट ची रुग्णसेवा दिलासादायक होती, असे रासने यांनी पत्रकात म्हटले आहे.
वैद्यकीय सेवेसाठी अपोलो हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि बंधन बॅंक यांचे सहकार्य ट्रस्टला मिळाले. या वैद्यकीय सेवेचे नियोजन ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले असून, त्याचे व्यवस्थापन ट्रस्टचे वैद्यकीय सेवा प्रमुख राजेंद्र परदेशी आणि त्यांचे सहकारी यांनी पाहिले. अशी माहिती सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
















