पुणे: पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात आणि दैनंदिन व्यवस्थापनात महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या आयुष्याची उमेदीची ३०-३५ वर्षे अखंड सेवा देऊन निवृत्त होणारे कर्मचारी हे शहराच्या जडणघडणीचा खरा कणा आहेत, असे प्रतिपादन माय माऊली केअर सेंटर आणि लायन्स क्लब ऑफ कात्रज, पुणे चे संस्थापक,अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी केले.
पुणे महानगरपालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला महापालिका कामगार आयुक्त नितीन केंजळे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ३८ कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
आपल्या भाषणात वरुडे पाटील म्हणाले की, ५५० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त विस्तीर्ण क्षेत्रफळ आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या सांभाळणे हे मोठे आव्हान आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता आज दोन नव्हे तर तीन महापालिकांची गरज भासते. अशा प्रचंड कामाच्या ताणातही पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा चोख ठेवण्याचे काम हे कर्मचारी सातत्याने करत आले आहेत. पूरस्थिती, साथीचे आजार, गणेशोत्सव किंवा पालखी सोहळा अशा प्रत्येक कसोटीच्या क्षणी २४ तास तत्पर राहून कर्मचाऱ्यांनी पुणेकरांची सेवा केली आहे.
शासकीय चौकटीत काम करताना नियमांचे पालन आणि विविध स्तरांवर समन्वय साधताना अनेकदा कर्मचाऱ्यांना विनाकारण टीकेला सामोरे जावे लागते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “माझ्या एका चुकीमुळे महापालिकेचे नाव खराब होऊ नये, या निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कळत-नकळत अवाजवी टीका झाली असेल, तर तमाम पुणेकरांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो.”
निवृत्तीनंतर सुरू होणाऱ्या जीवनाच्या नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे, कुटुंबाला वेळ देण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ३८ कर्मचाऱ्यांना पुढील सुखी, निरोगी व समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन उप कामगार अधिकारी अमित चव्हाण यांनी केले.
















