महाळुंगे-मानमधील रस्ते, वाहतूक आणि सुरक्षिततेचे प्रश्न ऐकून सुप्रिया सुळे यांचे पाठपुराव्याचे आश्वासन

म्हाळुंगे  : महाळुंगे-माण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरे रस्ते, जड वाहनांचा वाढता वावर, बंद पथदिवे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी नागरिकांनी सविस्तर चर्चा केली. गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) महाळुंगे येथील व्हीटीपी अल्पाइन सोसायटीमध्ये झालेल्या या बैठकीत म्हाळुंगे टाउनशिप रहिवासी संघाच्या वतीने विविध समस्यांचा आढावा घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

महाळुंगे टाउनशिप रहिवासी संघाचे अमित कुटे आणि ऋषिकेश मारणे यांनी मागील काही महिन्यांपासून विविध शासकीय यंत्रणांकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती खासदार सुळे यांना दिली. परिसरात निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक विकास झपाट्याने होत असताना रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा विकास मात्र त्या तुलनेत झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाळुंगे-नांदे रस्त्याचा प्रादेशिक आराखड्यातील २४ मीटर किंवा म्हाळुंगे-मान नगररचना योजनेतील ३६ मीटर रस्त्याच्या नियोजनानुसार प्रत्यक्ष विकास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच म्हाळुंगे-रेव्हिएरा रस्त्याचे संपूर्ण आणि दर्जेदार काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तात्पुरती डागडुजी आणि पॅचवर्क करून प्रश्न सुटणार नाही. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन कायमस्वरूपी रस्त्यांचे जाळे विकसित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.

पुणे महानगरपालिकेकडून २९ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या पत्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास प्रशासकीय अडचण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करता येईल, असे महापालिकेने कळवले आहे.मात्र, कामाची व्याप्ती, उपलब्ध निधी, काम सुरू होण्याची तारीख आणि पूर्णत्वाची कालमर्यादा याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. विशेषतः गोडरेज २ परिसरातील रस्त्याच्या कामाचा उल्लेख असला तरी म्हाळुंगे-रेव्हिएरा सोसायटीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्याचा समावेश आहे की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे कामाची व्याप्ती, निधी, टप्पे आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

See also  भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये टेक्नो-इनोव्हा-२०२६ स्पर्धेची धमाक्यात सुरुवात

महाळुंगे-रेव्हिएरा परिसरातील रस्त्यांवर ट्रक, हायवा, आरएमसी मिक्सर, टँकर आणि ट्रेलर यांसारख्या जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. अरुंद रस्ते, अतिवेग आणि ओव्हरलोडिंगमुळे पादचारी, शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जड वाहनांसाठी वेळेनुसार वाहतूक निर्बंध, अतिवेग आणि ओव्हरलोडिंगवर नियमित कारवाई, आवश्यक ठिकाणी नो-एंट्री फलक, बॅरिकेडिंग, अपघातप्रवण ठिकाणांचे सुरक्षा परीक्षण आणि शाळांजवळ विशेष वाहतूक नियंत्रण लागू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

परिसरातील बंद आणि अपुरे पथदिवे सुरू करणे, आवश्यक ठिकाणी नवीन दिवे बसवणे आणि चौक तसेच अपघातप्रवण ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रकाशव्यवस्था महत्त्वाची असल्याचे रहिवाशांनी नमूद केले. दरम्यान, परिसरातील नदीमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचा मुद्दाही खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. संबंधित विभागांनी पाहणी करून प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

महाळुंगे टाउनशिप रहिवासी संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना सविस्तर निवेदनासह ४६ पानांचा कागदपत्रांचा संच देण्यात आला. यामध्ये महापालिका आणि संबंधित विभागांकडे केलेला पत्रव्यवहार, यापूर्वीची निवेदने, बैठकींची कागदपत्रे, महापालिकेची उत्तरे आणि प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा समावेश आहे.रस्ते, वाहतूक, पथदिवे आणि नियोजित विकासकामांचे प्रश्न विविध विभागांशी संबंधित असल्याने महापालिका आयुक्तांच्या स्तरावर स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून मंजुरी, निधी, कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीचा नियमित आढावा घेऊन कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत संबंधित विभागांशी आवश्यक समन्वय साधून आपल्या स्तरावरून मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत नागरिकांनी रस्त्यांची कामे, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. कामाची अधिकृत तारीख, निधी आणि पूर्णत्वाचे वेळापत्रक जाहीर करावे. आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

See also  औंध येथे फुलोरा फाउंडेशन तर्फे शालेय साहित्याचे वाटप

या बैठकीला म्हाळुंगे टाउनशिप रहिवासी संघाचे अमित कुटे, हर्षदा थिटे, अंकुश पाडाळे, सौम्या सरकार, ऋषिकेश मारणे, आशिष बापट, नितीन बेनके, महेश कुंटरकर, विजय महाजन, आनंद जगताप आणि स्वप्निल टिकेकर उपस्थित होते. गावकरी प्रतिनिधी म्हणून सागर पाषाणकर, तर स्थानिक प्रतिनिधी म्हणून जयेश मुरकुटे सहभागी झाले.

नागरिकांच्या वतीने स्वप्निल टिकेकर यांनी नियोजित रस्त्यांची कामे आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. हर्षदा थिटे यांनी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य रस्ते आणि पथदिव्यांची आवश्यकता अधोरेखित केली. महेश कुंटरकर यांनी पादचारी आणि शाळकरी मुलांसाठी सुरक्षित मार्गांची गरज व्यक्त केली. तर तेजस शिंदे यांनी नदी प्रदूषणाच्या प्रश्नाकडेही संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी केली. म्हाळुंगे टाउनशिप रहिवासी संघाने रस्त्यांची कामे प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत, वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजना लागू होईपर्यंत तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.