उद्योगनगरीमध्ये अल्युमिनियम ग्रेट डाय कास्टिंग तांत्रिक परिषद व प्रदर्शन २०२६चे उद्घाटन

पिंपरी : अल्युमिनियम ग्रेट डाय कास्टिंग, विद्युत वाहने, ईव्ही-मोबिलिटी ॲप्लिकेशन आणि आधुनिक वाहन उद्योगासाठी आवश्यक तंत्रज्ञान, नवकल्पना तसेच उत्पादन क्षेत्रातील आधुनिक प्रक्रियांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जीडीसीटेक तांत्रिक परिषद व प्रदर्शन २०२६’ चे उद्घाटन पिंपरी-चिंचवड येथील हॉटेल कलासागर येथे उत्साहात संपन्न झाले.

या परिषदेत अल्युमिनियमच्या मोठ्या आकारातील डाय कास्टिंग तंत्रज्ञानातील आधुनिक प्रक्रिया, विद्युत वाहनांसाठी आवश्यक घटक, ईव्ही-मोबिलिटी ॲप्लिकेशनमधील तांत्रिक आवश्यकता, वाहन उद्योगातील बदल, उत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच भविष्यातील औद्योगिक संधी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे खरेदी व पुरवठा साखळी विभागाचे मुख्य अधिकारी जयकुमार एस. चुट्टर, ज्येष्ठ सल्लागार व उद्योजक तसेच मिटकॉन चे माजी विभागप्रमुख राजेंद्र घोरपडे आणि जीडीसीटेकचे अध्यक्ष तथा पूजा प्रिसिजन लिमिटेडचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, जीडीसीटेकचे संस्थापक आर टी कुलकर्णी , जीडीसीटेकचे सेक्रेटरी अनिरुद्ध इनामदार, जीडीसीटेकचे उपाध्यक्ष सागर कौशिक,जितेंद्र लखोटिया,किशोर डुकरे,खजिनदार नितीन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिषदेदरम्यान उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उत्पादक, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी आणि व्यावसायिकांनी परस्पर संवाद साधला. डाय कास्टिंग तंत्रज्ञान, ईव्ही-मोबिलिटी ॲप्लिकेशन, विद्युत वाहन उद्योग आणि आधुनिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व भविष्यातील संधींबाबत यावेळी विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

अल्युमिनियम डाय कास्टिंग उद्योगाला विद्युत वाहन, ईव्ही- मोबिलिटी आणि आधुनिक वाहन उद्योगाशी जोडण्यासाठी जीडीसीटेक २०२६च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भारतीय उत्पादन क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

या प्रदर्शनात अल्युमिनियम डाय कास्टिंगचे विविध घटक, उत्पादन तंत्रज्ञान, ईव्ही-मोबिलिटीसाठी वापरले जाणारे घटक व ॲप्लिकेशन, तसेच आधुनिक औद्योगिक उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याबरोबरच विविध कंपन्यांशी व्यावसायिक संवाद साधण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले. जीडीसीटेकचे अध्यक्ष तथा पूजा प्रिसिजन लिमिटेडचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, उद्योग प्रतिनिधी आणि सहभागींचे आभार मानले.

See also  ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर अखेर प्रशासनाला जागा औंध येथील नागरस रस्त्यावरील रस्ते दुरुस्ती व चौकातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू