पुणे : पाषाण रोडवरील पंचवटी मुख्य प्रवेशद्वार चौकात पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीतून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाहत असून, दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) या केंद्रशासित संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यावरून वाहणारे हे पाणी पुढे एनसीएल इनोव्हेशन पार्कच्या प्रवेशद्वारापर्यंत जात आहे. त्यामुळे रस्त्यावर शेवाळ साचून तो निसरडा झाला असून, दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पादचारी मार्गाखालून पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात आहे. रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. साचलेले पाणी चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, या पाण्यातून वाहने गेल्यानंतर पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर घाण पाणी उडत असल्याने वाहनचालक व पादचारी यांच्यात वादाचे प्रसंगही घडत आहेत.
या समस्येमुळे स्थानिक नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची गळती तातडीने बंद करून रस्त्यावरील पाणी हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात २४ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या चतुःशृंगी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले. पुढील ४८ तासांत पाण्याची गळती बंद न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या ठिकाणी अपघात होऊन जीवित अथवा वित्तहानी झाल्यास संबंधित प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
















