हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो स्थानकांच्या नामकरणात बदल; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मागणीला यश; मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करण्यासह रस्ते दुरुस्तीसाठीही पाठपुरावा करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील स्थानकांना भौगोलिक स्थानांनुसार नावे देण्याच्या मागणीला यश आले असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. या मार्गावरील ‘यशदा’ स्थानकाचे नाव बदलून ‘सकाळनगर’, तर ‘आरबीआय’ स्थानकाचे नाव ‘भोसलेनगर आरबीआय’ असे करण्यात आले आहे. शेतकी महाविद्यालय स्थानकाचे नाव बदलून ‘मॉडेल कॉलनी’ करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा शिवाजीनगर ते हिंजवडी हा भाग छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून जातो. या मार्गावरील ‘यशदा’, ‘आरबीआय’ आणि ‘शेतकी महाविद्यालय’ ही नावे परिसरातील भौगोलिक ओळखीऐवजी तेथील संस्थांच्या किंवा इमारतींच्या नावांवरून ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्थानकांना परिसराच्या भौगोलिक ओळखीनुसार नावे द्यावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी १ जून २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन स्थानकांच्या नावांमध्ये बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मेट्रो स्थानकांच्या नामकरणासोबतच मेट्रो प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आणि मेट्रो मार्गाखालील रस्त्यांची दुरुस्ती होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. मेट्रोचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्थानकांच्या नावांमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत होत असले, तरी मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत रस्ते उपलब्ध करून देणे याकडेही आमदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

See also  मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; प्रचंड गर्दीत मोहोळ यांचा अर्ज दाखल