कोथरूड सर्व्हे क्रमांक ४४ मधील प्रकल्प क्लस्टर योजनेत समाविष्ट करा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयराम सहकारी गृह रचना संस्थेच्या सभासदांचे निवेदन

पुणे : कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ४४ मधील जयराम सहकारी गृह रचना संस्थेसह परिसरातील नागरिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रकल्पाचा समावेश क्लस्टर योजनेत करावा, अशी मागणी सभासदांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. माजी आमदार व शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्या समवेत सभासदांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे फेस्टिव्हलच्या महर्षी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आले असताना ही भेट झाली. यावेळी सर्व्हे क्रमांक ४४ मधील प्रकल्प क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या स्वीय सहायकांना दिले. तसेच या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनीही लक्ष घालून पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.

एसआरएऐवजी क्लस्टर योजनेची मागणी
सर्व्हे क्रमांक ४४ मधील रहिवाशांनी सध्या प्रस्तावित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेऐवजी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास करावा, अशी भूमिका मांडली. यामुळे रहिवाशांना अधिक लाभ मिळण्यासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवेदनात तीन वेगवेगळ्या सोसायट्यांचे डिम्ड कन्व्हेयन्स करून घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच १९९५ मधील मंजूर नकाशा आणि २०२४ मधील प्रस्तावित आराखड्यातील फरक, सुविधांच्या जागेत झालेली कथित घट, सभासदांच्या संख्येतील वाढ आणि भोगवटा प्रमाणपत्र व मालकी हक्क यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पार्किंग, आराखडा आणि रहिवाशांच्या हक्कांबाबत आक्षेप प्रस्तावित आराखड्यात पार्किंगची अपुरी व्यवस्था असल्याचा आक्षेप रहिवाशांनी घेतला. एका मजल्यावर ७२ फ्लॅट्स आणि एकूण ३६८ फ्लॅट्सच्या नियोजनामुळे लोकसंख्येची घनता वाढून आरोग्य व वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. याशिवाय पुनर्विकास प्रकल्पात रेरा कायद्याचे पालन, नवीन सभासदांसोबत नोंदणीकृत करारनामे, रहिवाशांची आवश्यक संमती तसेच विकासकाच्या एफएसआय आणि टीडीआरच्या वापराबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक संमती पूर्ण झाली आहे का, याबाबतही स्पष्टता मिळणे गरजेचे आहे.

नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणार
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन नागरिकांच्या हिताचा योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. तसेच रवींद्र धंगेकर या प्रकरणाचा पाठपुरावा करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘‘संविधान दिन’’ साजरा

या भेटीवेळी ज्येष्ठ नागरिक मनोहर धनवडे, मधुकर गोळे, राजकुमार म्होकर, सुरेशदादा मोहळ, कडू काका, राहुल वांजळे, सचिन यादव, निकुंज उभे, ऋषिकेश भरेकर, सागर वाहळे, स्वप्नील भोसले, दादा रानवडे, विजय उभे, अभिजित मोरे, शिवराज तोंडे, संगीता भोसले, शालन पासलकर, वत्सला कानगुडे, मथुबाई मारणे, अंजना मारणे, उलका कानगुडे, योगिता तोंडे, विमल बाई निवांगुणे,जनाबाई तोंडे, रंजना मारणे, सुजाता पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्व्हे क्रमांक ४४ मधील अनेक रहिवासी उपस्थित होते.

क्लस्टर योजनेत समावेश करून पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि रहिवाशांना अधिक न्याय्य लाभ मिळवून द्यावेत, हीच या नागरिकांची प्रमुख मागणी आहे.