पुणे : पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी ASEZ – वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या विद्यापीठीन विद्यार्थी स्वयंसेवक गटातर्फे रविवारी (२९ नोव्हेंबर) धानोरी येथील भारत माता रोड परिसरात ‘झिरो प्लास्टिक २०४०’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे १०० विद्यार्थी आणि युवा स्वयंसेवकांनी सहभाग घेत तब्बल एक टन प्लास्टिक कचरा संकलित केला.
प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. स्वयंसेवकांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेसाठी श्रमदान केले. युवकांच्या सामूहिक सहभागातून पर्यावरणपूरक समाजनिर्मितीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या मोहिमेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे, शशिअण्णा टिंगरे, सुयश टिंगरे, रफिक शेख, आरोग्य निरीक्षक सुहास चौरे, मुकादम भालचंद्र ओव्हाळ तसेच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी स्वयंसेवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अशा मोहिमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ASEZ म्हणजे ‘Save the Earth from A to Z’ अर्थात पृथ्वीचे सर्वांगीण संरक्षण. विद्यापीठीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सकारात्मक बदल घडविण्याचा संस्थेचा संकल्प आहे. संस्थेला आतापर्यंत ४०१ पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यामध्ये UNCCD कार्यकारी सचिव पुरस्कार आणि अमेरिकेचा प्रेसिडेंट्स व्हॉलंटियर सर्व्हिस अवॉर्ड यांचा समावेश आहे. तसेच जगभरातील १५१ संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
युवकांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त भविष्याच्या दिशेने सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले.
















