पुणे : केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जय भवानी ट्रस्ट आणि माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. पाषाण, पुणे येथून बीड जिल्ह्यातील कुंभेफळ येथील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक महिना पुरेल इतका अन्नधान्य साठा मदतीच्या स्वरूपात वितरित करण्यात आला.
दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, कोरडी पडलेली जमीन आणि उदरनिर्वाहाचे संकट यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या मदतीला धावून जात त्यांच्या घरातील चूल पेटती राहावी, मुलांच्या ताटात अन्न मिळावे आणि त्यांना काहीसा दिलासा मिळावा, या संवेदनशील भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जय भवानी ट्रस्ट आणि प्रमोद निम्हण यांनी पुढाकार घेतला.
“शेतकऱ्यांचे दुःख हे आपले दुःख समजून त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी आहे. गरजू कुटुंबांना मदत करून त्यांच्या जीवनात थोडासा दिलासा निर्माण करता आला, हे समाधान महत्त्वाचे आहे,” असे प्रमोद अण्णा निम्हण यांनी सांगितले.
या उपक्रमातून वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, औंध बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, भाजपा उत्तर कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर सोहम मुरकुटे,दिलीप खामकर, विठ्ठल जमदाडे, पांडुरंग पारखे, बालाजी रत्ने आदी उपस्थित होते.
















