रायरेश्वर मंदिरातून शिवज्योत घेऊन निष्ठावंत शिवसैनिक मुंबईकडे रवाना; चांदणी चौक येथे शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने शिवज्योतधारकांचे स्वागत

मुळशी : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात अभिषेक करून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक शिवज्योत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शिवभक्त विकास बांदल व त्यांचे सहकारी राजगड किल्ल्यावरून अनवाणी पायी चालत शिवज्योत घेऊन दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवतीर्थाकडे निघाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांची ही परंपरा सातत्याने सुरू असून, शिवसेनेप्रती असलेली निष्ठा, श्रद्धा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील प्रेम यातून दिसून येते.

मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुळशी तालुक्याच्या वतीने या शिवज्योतधारकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना मुळशी तालुकाप्रमुख सचिन खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राम गायकवाड, विभागप्रमुख किशोर गायकवाड आणि नितीन लोयरे उपस्थित होते.

शिवज्योतीच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा जागर करत, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरील निष्ठा व्यक्त करणाऱ्या या शिवसैनिकांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शिवज्योत घेऊन अनवाणी पायी मुंबईकडे निघालेल्या या शिवभक्तांचा प्रवास शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत राम गायकवाड यांनी व्यक्त केले.

See also  महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात,  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे मत