बाजीराव पेशवे पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी

पुणे : एनडीए मध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहाणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे हे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे त्यांचं कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार नामदार पाटील यांनी व्यक्त केले. तसेच बाजीराव पेशवे पुतळा स्मारकाच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीए मध्ये पुतळा उभारण्यात येत असून; या पुतळ्याचे अनावरण देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एनडीए येथे जाऊन पुतळ्याची पाहाणी करुन आढावा घेतला.

यावेळी एयर मार्शल ( निवृत्त) मा.भूषण गोखले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुंदनकुमार साठे भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाजीराव पेशवे यांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार विपुल खटावकर, स्कवॅड्रन लीडर प्रकाश शिंदे, मेजर राहुल शुक्ला, कर्नल रमीनदर सिंग, भाजयुमो च्या क्रीडा आघाडीचे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाच्या इतिहासातील थोरले बाजीराव पेशवे हे झंझावाती व्यक्तीमत्व होतं. त्यांनी केवळ युद्धभूमीवरच आपलं कौशल्य सिद्ध केले नाही, तर उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.

दरम्यान, यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एनडीए मधील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

See also  गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबीर लवार्डे येथे संपन्न