पुणे : कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ४४ मधील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न क्लस्टर योजनेच्या धर्तीवर सोडवून सर्व सुविधांनी युक्त असा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी राजीव गांधी पार्क रहिवासी संघाच्या (घोषित) बैठकीत करण्यात आली. या बैठकीला परिसरातील १५० ते २०० रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या स्वप्नातील घरे साकारताना नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि प्रकल्पाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सर्व रहिवाशांना विश्वासात घेण्यात यावे, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. नागरिकांच्या संमतीने आणि विश्वासानेच हा प्रकल्प सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. अन्यथा, सर्व संबंधित संस्थांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला.
बैठकीत दत्तात्रय गायकवाड, प्रथमेश ढोक, सागर वाहळे, प्रफुल्ल शिंदे, शिवाजी सोनार, संजय खोपडे, विजय ढवळे, स्वप्नील भोसले आणि अभिजीत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रहिवाशांच्या समस्या, प्रकल्पाचे स्वरूप आणि पुढील दिशा याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे आयोजन कुणाल पोळ, केशव बोडके, ऋषिकेश भरेकर, संतोष बोडके, नवनाथ पवार, कृष्णा तोंडे, सुभाष कांबळे, अभिमान मोरे, सोपान यनपुरे, मंगलताई जाधव, हिराबाई होजगे, विमलताई वाळुंज, अंजनाताई काळे, सुरेखाताई धुमाळ, संगीताताई शेळीकर, रेश्मा कात्रट, सुभद्रा चव्हाण यांच्यासह इतर रहिवाशांनी केले.
पुढील काळात सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा वांजळे यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यास सहमती दर्शविण्यात आली. यासंदर्भातील ठराव उपस्थितांनी स्वाक्षऱ्या करून मान्य केला. सर्व रहिवाशांचे हित जपून, त्यांना विश्वासात घेऊन आणि आवश्यक सोयी-सुविधांसह प्रकल्प साकारण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.















