बालेवाडीत बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त; २२ वर्षीय तरुणाला अटक; बाणेर पोलिसांची कारवाई; आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल

बाणेर : बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील मोकळ्या मैदानात बेकायदा अग्निशस्त्र बाळगणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला बाणेर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई २२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.

बाणेर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भोईन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बालेवाडी हायस्ट्रीट येथील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती बेकायदा अग्निशस्त्र घेऊन येणार आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांनी खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळी जाऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आदित्य दशरथ औचरे (वय २२, रा. शिवनेरी पार्क लेन क्रमांक ३, बालेवाडी, पुणे) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ काळ्या रंगाचे लोखंडी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का, याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, विजय खिल्लारे, अनिल केकान, गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, अतुल इंगळे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, प्रदीप खरात, गजानन अवातीरक, स्वप्निल मराठे, गणेश भोईने, समीर पवार कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करीत आहेत.

See also  पुणे शहरात भाजपाच्या मंडलाध्यक्षांची नावे जाहीर, मंडलाध्यक्षपदी एकाही महिला नाही; अन्य पक्षातून भाजपात स्थिरावलेल्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी