पुणे : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’च्या २०१८ व २०१९ या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा यशदा येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विवेक खांडेकर, वन अकादमी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, वनश्री पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल. संपूर्ण जगात जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणाने भरभरून दिले असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे. जन्म झाल्यापासून माणसाला निसर्गापासून प्राणवायू मिळतो. अंत्यसंस्कारालाही झाडाची लाकडे उपयोगात येतात. जीवन या शब्दातच वन समाविष्ट आहे. माणसाला जगविण्याची क्षमता निसर्गात आहे.
एकविसाव्या शतकात माणूस सामाजिक होण्याऐवजी स्वार्थाचा विचार करीत असताना पुरस्कार विजेत्यांनी सामाजिक जाणिवेतून आपापल्यापरीने निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या मदतीने महाराष्ट्रात २०१४ नंतर २ हजार ५५० वर्ग किलोमीटरने हरित आच्छादन वाढविले आणि तीवरांच्या जंगलामध्ये १०४ वर्ग किलोमीटरने वाढ केली. जगात वृक्षतोडी संदर्भात चर्चा सुरू झाली असताना आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्सर्जित होणारा कार्बन कमी आहे. अशा वातावरणात पर्यावरणप्रेमी आणि पुरस्कार विजेतेएकत्रितपणे मानवाची सेवा करीत आहेत.
आपण एकटे विश्वाचे पर्यावरण बदलू शकत नसलो तरी त्यासाठी आपला वाटा, योगदान देऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून वृक्ष लावण्याची विचारगंगा लोकांपर्यंत जावी, वृक्ष तोडणारे हात कमी होऊन वृक्ष लावणारे हात वाढावेत, वृक्ष संवर्धन संस्कृती वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करत असताना त्यांच्या विचारांचा जयघोष करतानाच आपण एक पाऊल कृतीच्या मार्गावर पुढे न्यायचे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे निसर्गसंवर्धनासाठीच्या कार्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरण रक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक व्हर्चुअल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. सयाजी शिंदेंसारख्या अभिनेत्याने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वनश्री पुरस्कार मिळवलेल्यांनी देखील या प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम केले आहे.
यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कारांचेही संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१८
*संवर्ग १- व्यक्ती :प्रथम पुरस्कार- रघुनाथ मारुती ढोले, घोरपडी, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुधाकर गुणवंतराव देशमुख, मु. ममदापूर, पो. पाटोदा, ता. अंबाजोगाई, जि. बीड, तृतीय पुरस्कार- रोहित शंकर बनसोडे, गोंदवले खुर्द, ता. माण (जि. सातारा)
*संवर्ग २- शैक्षणिक संस्था:* प्रथम पुरस्कार- म. वि.प. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव (जि. नाशिक), द्वितीय पुरस्कार- एस.एम. इंग्लिश स्कूल, वाशिम, तृतीय पुरस्कार-शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड (जि. औरंगाबाद)
संवर्ग ३- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- आधार फाऊंडेशन, मु.पो.रुकडी, ता. हातकणंगले (जि. कोल्हापूर), द्वितीय पुरस्कार- मराठवाडा जनविकास संघ, पिंपळे गुरव, पुणे – २७, तृतीय पुरस्कार- श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव (जि. जळगाव)
संवर्ग ४- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. बिदाल, ता. माण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- ग्रामपंचायत पुणतांबा- रस्तापूर, ता. राहता, (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. चिंचणी, ता. पंढरपूर (जि. सोलापूर)
संवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार- जिल्हा परिषद कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार- पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१९
संवर्ग १- व्यक्ती: प्रथम पुरस्कार- किसन धोंडीबा गारगोटे, पंचवटी, पाषाण रोड, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुशांत प्रकाश घोडके, समर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलनी, साईनगर, मु.पो. ता. कोपरगांव (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- सुनिल रामदास वाणी, श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव.
संवर्ग २- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार-मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड (जि. नाशिक), तृतीय पुरस्कार- स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे, ता. कराड (जि. सातारा).
संवर्ग ३- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत गमेवाडी, ता. कराड (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार-ग्रामपंचायत साबुर्डी, ता. खेड (जि. पुणे), तृतीय पुरस्कार-ग्रामपंचायत लोहसर, पाथर्डी (जि. अहमदनगर).
संवर्ग ४- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर, ता.आंबेगाव (जि.पुणे), द्वितीय पुरस्कार-शिवराज मित्र मंडळ, भैरवनगर, धानोरी रोड,पुणे-१५, तृतीय पुरस्कार- वसुंधरा अभियान, बाणेर, पुणे ४११०४५.
संवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार-वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, द्वितीय पुरस्कार-पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना.