पुणे, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती जाणून घेणे, खड्डे आणि खराब रस्त्यांचे पट्टे ओळखणे तसेच दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि Ather Energy Limited यांच्यात तंत्रज्ञानाधारित सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्यामुळे शहरातील रस्ते व्यवस्थापनासाठी कनेक्टेड इलेक्ट्रिक स्कूटर्समधून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग केला जाणार आहे.
Ather Energy च्या प्रस्तावानुसार, पुणे शहरात २४ हजारांहून अधिक Ather स्कूटर्स कार्यरत आहेत. या स्कूटर्समधील सेन्सर आणि टेलिमेट्री तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवासादरम्यान रस्त्यांच्या स्थितीशी संबंधित माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे खड्डे, रस्त्यांवरील खोदकामाचे पट्टे, गतिरोधक आणि रस्त्याच्या पृष्ठभागावरील इतर अडथळ्यांची ठिकाणे दर्शविणारे रोड हेल्थ मॅप्स तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
या माहितीमुळे महापालिकेला खराब रस्ते आणि समस्याग्रस्त ठिकाणे ओळखणे, दुरुस्तीच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविणे, आवश्यक ठिकाणी लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणे तसेच वारंवार समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे शक्य होईल. मात्र, हा डेटा महापालिकेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीला आणि सध्याच्या रस्ते देखभाल प्रक्रियेला पूरक म्हणून वापरला जाणार आहे.
या व्यवस्थेअंतर्गत नागरिकांचा किंवा Ather ग्राहकांचा वैयक्तिक डेटा पुणे महापालिकेला दिला जाणार नसून, केवळ एकत्रित भौगोलिक स्थानावर आधारित माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, ही माहिती Ather स्कूटर्सच्या प्रत्यक्ष वापरावर अवलंबून असेल. स्वयंचलितरीत्या संकलित होणाऱ्या माहितीच्या अचूकतेची स्वतंत्र हमी देण्यात आलेली नसल्याने प्रत्यक्ष पाहणीद्वारे माहितीची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या सामंजस्य कराराचा कालावधी एक वर्षाचा असून, या काळात कनेक्टेड मोबिलिटी डेटाचा शहरातील रस्ते व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी कितपत प्रभावी उपयोग करता येईल, याची चाचपणी केली जाणार आहे.
या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते. Ather Energy च्या वतीने मिलिंद कोठेकर (हेड ऑफ प्रॉडक्ट अँड चीफ ऑफ स्टाफ), डॉ. सुरेंदर सिंग्रोहा (कॉर्पोरेट, लीगल अँड पब्लिक पॉलिसी), ऋषिकेश प्रधान (सिनिअर प्रॉडक्ट मॅनेजर) आणि अमोल मोहिते (गव्हर्नमेंट रिलेशन्स अँड पॉलिसी) उपस्थित होते.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “रस्त्यांवरील त्रुटी वेळेत ओळखणे हे प्रभावी रस्ते देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. या सहकार्यामधून उपलब्ध होणारा डेटा समस्याग्रस्त रस्ते ओळखणे, दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देणे आणि वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करण्यासाठी अतिरिक्त माहिती म्हणून उपयोगी ठरेल. तंत्रज्ञानाधारित माहिती आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी यांची सांगड घालून पुण्यातील रस्ते व्यवस्थापन अधिक डेटा-आधारित व परिणामकारक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.”
















