बालेवाडी : ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि लहान मुलांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि विरंगुळ्यासाठी उद्यान उपलब्ध व्हावे, ही मूलभूत गरज आहे. मात्र, बालेवाडीतील मोझे महाविद्यालयासमोरील मधुबन आरा ते परफेक्ट १० रस्त्यावरील पुणे महानगरपालिकेच्या मालकीची प्लॉट क्रमांक ३५ ही जागा अनेक वर्षांपासून उद्यानाच्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या जागेचा तातडीने विकास करून नागरिकांसाठी खुली करावी, यासाठी स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी प्लॉट क्रमांक ३५ सोबतच प्लॉट क्रमांक ३४ या आरक्षित जागेचीही पाहणी करण्यात आली.
“उद्यान ही चैनीची गोष्ट नसून नागरिकांच्या आरोग्याची आणि जगण्याच्या गुणवत्तेची गरज आहे!” या भावनेतून ‘चला! फिरू या!’ ग्रुपसह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक या पाहणीमध्ये सहभागी झाले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्काच्या उद्यानासाठी एकत्र येऊन प्रशासनासमोर प्रश्न मांडणे, ही नागरिक सहभागातून लोकशाही बळकट करणारी सकारात्मक बाब आहे.
या पाहणी दरम्यान केवळ उद्यानाचा प्रश्न उपस्थित न करता परिसरातील दैनंदिन नागरी समस्यांकडे ही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. रस्त्यांची नियमित स्वच्छता करणे, ठिकठिकाणी साचलेले मातीचे व राडारोडा चे ढिगारे हटवणे आणि तुंबलेले ड्रेनेज चेंबर्स दुरुस्त करणे, अशा मागण्या प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून करण्यात आल्या.
साई चौकातून आर. के. म्युझियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा डेपो हलविण्याचे काम सुरू असून, दिवाळीनंतर संबंधित परिसर स्वच्छ करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
या पाहणी वेळी उप अभियंते श्री दीपक लांडे, रस्ते अभियंता संदीप चाबुकस्वार, अभियंता त्र्यंबक महाजन, वृक्ष निरीक्षक अनिल साबळे, आरोग्य निरीक्षक निखिल निकम आणि मुकादम विशाल आदमाने उपस्थित होते.
यावेळी आर. एन. जोशी, सुदर्शन जगदाळे, शिरीष बापट, रमेश जांभुळकर, सुभाष येवरे, गिरीश भगूरकर, रवींद्र खडतरकर, सुनील पांडे, के. जी. गिडवानिया, वसंत ताजणे, कमलेश मोकाशी, चंद्रकांत शिंपी, अरविंद जगताप, अलका जोशी, ज्योत्स्ना उसवाडकर, सुप्रिया पांडे, नंदा मुलमुले, शोभना महाजन, गीता गायकर आदी नागरिक उपस्थित होते.
प्लॉट क्रमांक ३५ आणि ३४ या आरक्षित जागांबाबत आवश्यक कार्यवाही करून उद्यान विकासाला तातडीने सुरुवात करावी, जागेची स्वच्छता करून ती नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी आणि परिसरातील स्वच्छता व ड्रेनेजच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विकास केवळ कागदावर नको, तो नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनात दिसला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित जागा, मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि महिलांना मोकळ्या हवेत वेळ घालवण्यासाठी उद्यान मिळणे, ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. नागरिकांनी एकजुटीने केलेला हा पाठपुरावा प्रत्यक्ष कामात रूपांतरित होऊन बालेवाडीकरांना लवकरच हक्काचे उद्यान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
















