मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लोकनेते अजितदादा पवार कन्या सक्षमीकरण अभियान’ सुरू

पुणे : मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ‘स्व. लोकनेते अजितदादा पवार कन्या सक्षमीकरण अभियान’ सुरू करण्यात आले. गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानाच्या माध्यमातून मुलींना सक्षम बनविणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे तसेच सामाजिक जाणीव आणि स्वावलंबनाची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी वेदवती चॅरिटेबल फेडरेशनच्या वतीने पथनाट्य सादर करून महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा निर्मलाताई नवले, पीडीसीसी बँकेचे संचालक सुरेशआण्णा घुले, माजी आमदार तथा पुणे शहराध्यक्ष सुनीलआण्णा टिंगरे, नगरसेवक राकेश कामठे यांच्यासह पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या अभियानाच्या टी-शर्टचे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी पार्वती निम्हण यांनी सांगितले की, लोकनेते अजितदादा पवार यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून मुलींसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मुलींना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

See also  वाहतुकीला अडथळा ठरलेले औंध मधील हेरिटेज स्ट्रक्चर हलविणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे