कोथरूड : कोथरूड येथील हनुमान नगर आणि केळेवाडी परिसरातील नागरिकांनी क्लस्टर पुनर्विकासाच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. भाऊबीजेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन त्यांना ओवाळणीच्या स्वरूपात ‘क्लस्टर योजना’ देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी परिसरातील सर्व महिला ठाणे येथे जाणार असल्याचा निर्णय रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आला.
केळेवाडी येथील जयराम सहकारी गृह रचना मर्यादित संस्थेच्या बैठकीत तसेच जय श्रीराम तरुण मंडळ येथे झालेल्या चर्चेत महिलांनी हा निर्धार व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊबीजेनिमित्त हनुमान नगरमधील महिलांना क्लस्टर पुनर्विकासाची ओवाळणी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या उपक्रमासाठी पुणे शहरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही नागरिकांनी केली.
कोथरूडमधील सर्वे क्रमांक ४४ परिसरात प्रस्तावित एसआरए योजना नागरिकांच्या सोयीची नसल्याची भूमिका रहिवाशांनी मांडली आहे. या योजनेला परिसरातील अनेक नागरिकांनी विरोध दर्शविला असून, त्याऐवजी शासनाची नव्याने सुरू झालेली क्लस्टर पुनर्विकास योजना राबविण्यात यावी, अशी त्यांची सातत्याने मागणी आहे.
यासंदर्भात एसआरए आयुक्तांकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याची तक्रार नागरिकांनी बैठकीत केली. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असून, आपल्या पुनर्विकासाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाऊबीजेच्या निमित्ताने ठाणे येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
‘भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आम्हाला क्लस्टर पुनर्विकास योजना द्या,’ अशी आगळीवेगळी मागणी हनुमान नगरमधील महिलांकडून करण्यात येत आहे.















