बाणेर, दि. ३१ ऑक्टोबर : बाणेर परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी होण्याची घटना समोर आली असून, चोरट्यांनी चक्क भरवस्तीत एका बंगल्याबाहेरील चंदनाचे झाड कापून नेले आहे. आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद पेंढारकर यांच्या ११, पंचशील पार्क, सर्व्हे क्रमांक २५६, बाणेर येथील बंगल्याच्या बाहेर असलेले चंदनाचे झाड चार चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटांत कापून नेले. हे चोरटे नंबर प्लेट नसलेल्या स्विफ्ट डिझायर कारमधून आले होते. पहाटेच्या वेळी परिसरात कोणी नसल्याची संधी साधत त्यांनी ही चोरी केली.
घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
बाणेरसारख्या गजबजलेल्या निवासी भागात भरवस्तीत चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनातून येऊन काही मिनिटांत झाड कापून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
















