स्व. विश्वनाथ कांबळे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय प्रतिभा शोध स्पर्धा उत्साहात; २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव; गुणवंतांना रोख पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे वितरण

हडपसर : स्व. विश्वनाथ (नाना) संभाजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली नॅशनल टॅलेंट क्वेस्ट (NTQ) स्पर्धा परीक्षा २०२६ आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. गोंधळेनगर येथील कै. रामचंद्र बनकर इंग्रजी माध्यम विद्यालयात रविवार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक अजित आबा घुले, पर्यवेक्षिका लीला मोरे, संस्थाध्यक्ष अंबादास कांबळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणेचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले आणि जी. के. फाउंडेशनचे अध्यक्ष गुंडप्पा खडके यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

हडपसर-मांजरी प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत  तुपे, नगरसेवक मारुती तुपे आणि शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका सारिका घुले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

इयत्ता सहावी ते आठवी या गटात सोहम पांचाळ याने प्रथम, सिद्धी भंडारे हिने द्वितीय, तर आशिष रायपुरे याने तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता तिसरी ते पाचवी या गटात श्रीवर्धन कणसे याने प्रथम, आरोही माने हिने द्वितीय, तर अर्णव खरात याने तृतीय क्रमांक मिळविला. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. यासोबतच ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी प्राचार्य संजय घोडके, मुख्याध्यापक विनायक पुणेकर, लविना चांदेकर, श्रीकांत ठाकूर, श्रीकांत गिरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अंबादास कांबळे, श्रीकांत ठाकूर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीला मोरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, अभ्यासाचे नियोजन आणि भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुदळे आणि सलमा शेख यांनी केले. आकर्षक रांगोळी गीता काथवटे व मेघा कांबळे यांनी साकारली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय कांबळे, प्रफुल्ल कांबळे, वैभव काथवटे, प्रशांत कांबळे, जगदीश खडके आणि शिंदे मामा यांनी विशेष सहकार्य केले. परीक्षेचे व कार्यक्रमाचे नियोजन अक्षयकुमार कांबळे यांनी केले. बाळकृष्ण चोरमले यांनी आभार मानले.

See also  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा

शांतीविश्व शैक्षणिक आणि सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर, शारदा सोशल फाउंडेशन, मांजरी बुद्रुक आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.