“आय.यु.सी.एन. या आंतरराष्ट्रीय संस्थेवर डॉ. श्रीनाथ कवडे यांची निवड”

पुणे : निसर्गातील जैविक विविधता व प्रजातींच्या संवर्धनात जागतिक स्तरावर काम करणाऱ्या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचर (आय.यु.सी.एन.) या संस्थेच्या स्पेशीस सर्व्हाइवल कमिशन चे सदस्य म्हणून पुण्यातील वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांची नुकतीच निवड झाली. तसे पत्र आय.यु.सी.एन. चे चेअर जॉन पॉल रॉड्रिगझ यांच्या कडून डॉ. कवडे यांना नुकतेच प्राप्त झाले.

१८६ सदस्य देशांतून तब्बल १७५ स्पेशीस सर्व्हाइवल कमिशन गटाचे सदस्य युनेस्को साठी काम करीत असून वनस्पती, प्राणी, कीटक, पक्षी, फुलपाखरं, इ. चे निसर्गातील स्थान आणि त्यांच्या अधिवासाचा दर्जा यावर आय.यु.सी.एन. चे विशेष कार्य आहे. शास्त्रीय दृष्टीकोणातून प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी त्यांची विशेष कृती योजना व आराखडा तयार करण्याचे काम आय.यु.सी.एन. करत असून ‘रेड डेटा ऑफ थ्रेटन्ड स्पेशीस’ च्या माध्यमातून निसर्गातील संवदेनशील घटकांवर या संस्थेकडून विशेष भर दिला जातो. डॉ. कवडे हे ‘पश्चिम घाट स्पेशीस सर्व्हाइवल कमिशन’ चे भारतातील सदस्य म्हणून काम पाहणार असून सह्याद्रीतील दुर्मिळ व धोकाग्रस्त वनस्पतींवर विशेष भर देऊन त्यांच्या संवर्धनात कार्य करणार आहेत. तसेच युनेस्को-जागतिक वारसा स्थळ नामनिर्देश प्रक्रियेत समीक्षक म्हणून काम पाहण्याची संधी देखील त्यांना मिळाली आहे हे विशेष.

जागतिक वारसा स्थळ असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील वनस्पती वर्गीकरण आणि फ्लोरा वर डॉ. कवडे यांचे संशोधन झाले असून त्यांनी या विषयावर पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे. गेली अनेक वर्ष सह्याद्री आणि कोकणामधील अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं या ठिकाणी त्यांनी संशोधन केले असून प्रदेशनिष्ठ, धोकाग्रस्त व दुर्मिळ वनस्पतींवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. डॉ. कवडे यांनी गेली २० वर्ष पुण्यातील एस. पी, कॉलेज व लांजा, रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून काम केले असून कुंडल फॉरेस्ट अकॅडमि, सांगली व दापोली कॉलेज इथे व्हिसीटींग फॅकल्टी म्हणून काम करत आहेत. सह्याद्रीच्या जंगलांत, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या निसर्ग संपन्न भागांत संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सोसायटी फॉर एनव्हरॉन्मेंट अँड बीयोडायव्हर्सिटी काँसर्वेशन (एस.इ.बी.सी.) या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून स्थानिक वृक्षांचे संवर्धन, लागवड, वृक्ष गणना, आधुनिक क्यू.आर. कोड च्या माध्यमातून वृक्षाची ओळख तसेच स्थानिक शेतकऱ्यांसाठी बायोव्हिलेज, मधमाशी पालन, गांडूळखत प्रकल्प, इ. क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. युवकांना पर्यावरण पूरक व्यवसाय निर्माण करून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठीही ते प्रयत्नशील असून संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि गोव्यातील पणजी इथे २०१५ पासून ‘जैवविविधता दिवस’ साजरा करून निसर्ग संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत.

See also  आजचा अर्थसंकल्प म्हणजे युतीचे संकटकालीन रेवडी वाटप!: मुकुंद किर्दत, आप