बाणेर-बालेवाडी मेट्रो स्थानकांचे काम अपूर्ण असताना उद्घाटनाची घाई कशासाठी?; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा विरोध; बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानके सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी; मेट्रो प्रशासनाचा निषेध

पुणे : मौजे माण, हिंजवडी, बालेवाडी, बाणेर ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरील सेवेचे उद्घाटन उद्या, दि. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण असून एकही स्थानक प्रवाशांसाठी सुरू नसल्याने या उद्घाटनाला स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानके अद्याप कार्यान्वित झालेली नसताना उद्घाटनाची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला आहे. केवळ उद्घाटन आणि श्रेयवादासाठी अर्धवट कामांचे लोकार्पण केले जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या संदर्भात पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सीएमआरएसच्या कारणासह केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडून काही आवश्यक परवानग्या मिळणे बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानकांची कामे अपूर्ण राहिली असून, ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर आज बाणेर-बालेवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी पीएसआय खिल्लारे, अमर लोंढे, बाणेर बालेवाडी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष ओम शिवाजी बांगर आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर उपस्थित होते.

मेट्रोचा प्रत्यक्ष लाभ बाणेर-बालेवाडीतील नागरिकांना मिळणार नसेल, तर केवळ उद्घाटन करून काय साध्य होणार? स्थानकांची कामे पूर्ण करून सेवा प्रत्यक्ष सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

See also  बाणेर बालेवाडी व राजीव गांधी आयटी पार्क मधील नागरिकांच्या समस्या बीबीपीआरएच्या कोअर कमिटी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडल्या