खैरेवाडीतील SRA योजनेला नागरिकांचा विरोध; संमतीपत्रावर सह्यांसाठी दमदाटी केल्याचा आरोप; बिल्डर पराग कुलकर्णी आणि माजी आमदार अनिल भोसले यांच्या नावाचा वापर; दोन अनोळखी व्यक्तींविरोधात चतु:श्रृंगी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पुणे : शिवाजीनगर येथील खैरेवाडी परिसरातील वीर चाफेकर सहकारी गृहरचना संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रस्तावित योजनेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. या योजनेच्या संमतीपत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारदार वसुधा संदीप पवार (वय ४२, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती खैरेवाडी परिसरात आल्या. त्यांनी वसुधा पवार यांच्यासह प्रियांका अनिल गायकवाड आणि लता जांभेकर धोत्रे यांना SRA संमतीपत्रावर सह्या करण्यास सांगितले. तसेच, ‘आम्ही अनिल भोसले आणि पराग कुलकर्णी यांचे बाहेरचे माणसे आहोत,’ असे सांगत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एन.सी.आर. क्रमांक १९२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत नोंद केली आहे. घटनेची स्टेशन डायरीमध्येही नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता SRA योजना राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. योजनेला संमती देण्यासाठी दबाव आणला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मात्र, तक्रारीत उल्लेख असलेल्या माजी आमदार अनिल भोसले आणि बिल्डर पराग कुलकर्णी यांचा या कथित प्रकारातील प्रत्यक्ष सहभाग अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यांचा उल्लेख तक्रारदारांनी अनोळखी व्यक्तींनी केलेल्या कथित वक्तव्याच्या अनुषंगाने केला आहे.

See also  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भारत सरकारच्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन