हडपसर : फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर येथे जनजागृतीपर नाटकाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटकातून प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण पर्यावरणासह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुपक्ष्यांसाठीही हानिकारक ठरते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून फटाक्यांचा वापर टाळण्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
या नाटकात सोहम पांचाळ, आयुष शिंदे, मोहम्मदसाद शेख, श्रवण गायकवाड, इशिता कांबळे, दिशा कनोजिया, आरोही आटोळे आणि दिव्या चव्हाण यांनी विविध भूमिका साकारल्या. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला.
नाटकानंतर अस्मिता मॅडम, कृष्णाली मॅडम, सलमा मॅडम, वंदना मॅडम आणि गावडे सर यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अक्षयकुमार कांबळे सर यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक अक्षयकुमार कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची भावना रुजण्यास मदत झाली. ‘प्रदूषणमुक्त दिवाळी, सुरक्षित दिवाळी आणि आनंदी दिवाळी’ हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
















