ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधनाला चालना द्या ; विद्यार्थ्यांना नवोन्मेषाच्या संधी मिळाल्यासच जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा शक्य – डॉ. विवेक सावंत

पुणे : जगाची नवीन अर्थव्यवस्था ही ज्ञानावर आधारित असून ज्ञान हाच तिचा कच्चा माल आहे. संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपत्तीवर आधारित रॉयल्टी ही भविष्यातील अर्थव्यवस्थेची महत्त्वाची ताकद ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी, अत्याधुनिक ज्ञान आणि नवउत्पादनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली बुद्धिमान मुले परदेशात जाऊन संशोधन करतात आणि त्यातून मिळणारी बौद्धिक संपत्ती परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून बाजारात येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी देशातच नवोन्मेषाच्या संधी निर्माण कराव्या लागतील, असे मत एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक आणि महात्मा गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६’ अंतर्गत ‘तरुणांसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,  एम. एस. जाधव, प्रवीण सप्तर्षी, रमेश आढाव यांच्यासह आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, सचिन चौहान, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘नवीन अर्थव्यवस्थेचा आधार ज्ञान असून एकदा ज्ञानावर गुंतवणूक केली की त्यातून दीर्घकाळ रॉयल्टी निर्माण होऊ शकते. मोबाईल तंत्रज्ञानामध्ये हजारो पेटंटचा वापर होतो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तुलनेने कमी पार्ट असले तरी त्यामागील विविध तंत्रज्ञान आणि पेटंटसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली नाही, तर देशाला अशा प्रकारची बौद्धिक संपत्ती निर्माण करता येणार नाही.’’

एमकेसीएलच्या माध्यमातून राज्यात सुमारे ६ हजार ३०० केंद्रे कार्यरत असून दरवर्षी सुमारे नऊ लाख विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संगणक शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘आज वेग, अतिवेग आणि जीवघेणा वेग अशा तीन पातळ्यांवर समाज बदलत आहे. या वेगाशी जुळवून घेताना युवकांची दमछाक होत आहे. पूर्वी स्थैर्य आणि निश्चितता होती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने परिवर्तन होत आहे. आव्हान म्हणजे अशक्यता नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

See also  97% गुणांसह शाळेत प्रथम आलेल्या साई श्रीकांत कदमसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान

ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी अद्याप मोठी असून ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान आहे. मूठभर यशस्वी व्यक्तींच्या उदाहरणांवरून यशाचे मापदंड ठरवल्याने युवकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण होत आहे. एकसारख्या परीक्षा आणि ठरावीक उत्तरपद्धतीमुळे नवीन विचारांना पुरेशी चालना मिळत नाही. विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता आणि कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे; मात्र पारंपरिक शिक्षणपद्धतीत त्यावर पुरेसा भर नसल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत संसाधने मर्यादित असल्याने विकासाची प्राथमिकता लोकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित असली पाहिजे. शिक्षणाच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेत वाढ करण्याची गरज आहे. शिक्षकांवर विविध प्रकारची अतिरिक्त कामे सोपविली जात असल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होतो. उच्च शिक्षणातील प्रवेशातही घट होत असल्याने युवकांना शिक्षणानंतरच्या संधींबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी दीर्घकालीन धोरण आवश्यक असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

महात्मा गांधींची तत्त्वे आणि कार्यपद्धती आजही कालबाह्य झालेली नाही. गांधींनी विविध विषयांचा अभ्यास करून मांडलेली तत्त्वे आज कॉर्पोरेट जगतातही व्यवस्थापनाच्या संदर्भात अभ्यासली जातात. केवळ पुस्तकी शिक्षणामुळे रोजगारक्षमतेचा प्रश्न सुटत नाही. वाढता चंगळवाद आणि पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर गांधींचे पर्यावरणविषयक विचार आजही महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले.

देशातील संपत्तीचे केंद्रीकरण, युवकांमधील असुरक्षितता, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि संस्थात्मक व्यवस्थेवरील घटता विश्वास ही आव्हाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर युवकांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि कौशल्यविकासासाठी होण्याऐवजी भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी होऊ नये. युवकांना रोजगार आणि स्वतःच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी दीर्घकालीन संधी निर्माण करणे आवश्यक आहे. देश संविधानाच्या चौकटीत चालविण्यासोबतच चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक जबाबदारीची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

देशात सत्ताधारी राज्य करण्यासाठी जातीधर्म आधारित ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. मूलभूत गोष्टीसाठी विद्यार्थी यांना झगडावे लागते त्यामुळे लोकशाही मध्ये आपण खरेच राहतो का असा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या प्रश्नावर कोणी आवाज उठवला की त्याला एखादे लेबल लावून त्याची बदनामी केली जाते. भारताची खरी ताकद लोकात असून त्याचे प्रतीक त्याठिकाणी जाणवत होते आणि मुली त्याठिकाणी २४ तास स्वतःला सुरक्षित समजत होत्या. पितृसत्ताक चौकट त्याठिकाणी ढासळताना पहिले. मुलींचे नेतृत्व मुले मान्य करत होते. तृतीयपंथी यांना देखील सन्मानाने समाविष्ट करून घेतले होते. हीच खरी जेन-झी ची ताकद होती.

See also  कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : भू-संपादनासाठी कोट्यवधींची तरतूद, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे

अध्यक्षीय समारोप करताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, तरुणांसमोरील आव्हाने यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी यांनी जंतरमंतर येथे प्रयत्न केले. गुणात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे हा संघर्ष पुढे देखील चालू राहील. शिक्षण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु शिक्षणाचे खासगीकरण करणे हा अलिखित नियम सरकारचा झाला आहे. इंडिया आणि भारत यामधील दरी मिटविणे हा खरा प्रश्न आपल्यासमोर आहे.गांधी विचार हा देशाचा मध्यवर्ती विचार आहे.महात्मा गांधी हे भारताचे आत्मा आहे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा कणा आहे.

रमेश आढाव यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधींचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा उल्लेख केला. त्याच कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन तेजस भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन अप्पा अनारसे यांनी  केले.