ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; प्रतिटन ४२०० रुपयांचा तोडगा

पुणे :ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तोडगा निघाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ४२०० रुपये मिळण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये पहिली उचल म्हणून प्रतिटन ३९०० रुपये देण्यात येणार असून, गळीत हंगाम संपण्यापूर्वी आणखी १०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच साखरेचे दर वाढल्यास प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ४२०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीला प्रतिटन ३५०० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नसलेल्या साखर कारखानदारांना किमान ४००० रुपयांपर्यंत आणण्यात यश मिळाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.

या आंदोलनात माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह सहभागी झालेले आंदोलक आणि राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने भूमिका मांडली. चर्चेतून मार्ग निघाल्यानंतर शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

या तोडग्यानंतर राजू शेट्टी, आंदोलनात सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झालेल्या प्रवाशांनाही आता दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

See also  जयराम गृहरचना संस्था एसआरए प्रकल्पाबाबत रहिवाशांची माजी आमदार धंगेकरांकडे धाव; प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून न्याय मिळवून देण्याची मागणी; १४ ऑक्टोबरला पाहणी