बाणेर : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बाणेरकरांसाठी संगीताची अनोखी मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. श्रीनाथ सोशल फाऊंडेशन व गणेश कळमकर युवा मंच यांच्या वतीने रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘दिवाळी पहाट – स्वरउत्सव, सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम पहाटे ५ वाजता गणराज चौक, बाणेर येथील श्री गणेश मंदिरासमोर, एबीझेड बिल्डिंगशेजारी होणार आहे.या स्वरमय मैफलीत इंडियन आयडॉलचे प्रथम उपविजेते जगदीश चव्हाण आपल्या सुमधुर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना सहगायिका कृपा नाईक यांची साथ लाभणार आहे. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य आणि किराणा घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांच्या शास्त्रीय गायनाची विशेष मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन विश्वास नंदकुमार कळमकर यांनी केले आहे. मा. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजप पुणे शहराचे माजी सरचिटणीस गणेश ज्ञानोबा कळमकर हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून दिवाळी पहाटच्या या सुरेल स्वरउत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
















