दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रकांत पाटील यांचा अनोखा पुढाकार!समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देणार

पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने कोथरूडमधील समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात कोथरुडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

एल निनोचा प्रभाव आणि पावसातील तूट यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास दुष्काळग्रस्त नागरिकांना अधिक प्रभावीपणे मदत करता येईल, असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांतर्गत कोथरूडमधील स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निधी संकलित करावा. या संकलित निधीतून समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोविडच्या संकटात ज्या पद्धतीने लोकसहभागातून आपण एकत्रितपणे परिस्थितीवर मात केली, त्याचप्रमाणे दुष्काळाच्या संकटातही समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरी भागातील नागरिकांनी दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी योगदान द्यावे. या सामाजिक कार्यासाठी समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

See also  सहयोग फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून वारीमध्ये दिली जाणार आरोग्य सेवा