मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका-२०२६’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रविवारी, १५ नोव्हेंबरला दिमाखात संपन्न झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. ‘बंधू’ या सिनेमाचे प्रदर्शनाने रविवारपासून या चार दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ झाला असून महोत्सवात ३३ सिनेमे आणि १५ हून अधिक संवादसत्रांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव संपन्न होणार असून रविवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सव संचालक पुरुषोत्तम बेर्डे, प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष किरण शांताराम, उद्घाटकीय सिनेमा असलेल्या ‘बंधू’ चित्रपटातील कलाकार जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये यांच्यासह अलेक्झांडर माक्सुको (बेलारूस), फर्झाना अहमद चौधरी (बांगलादेश), पीअर स्टिवरलिंक (बेल्जिअम), कुईन जी (चीन), झिपोर झामा (दक्षिण आफ्रिका), दहलिया तबकोल (इजिप्त), वू थी टू (व्हिएतनाम), महम्मद कुर्निया वान (इंडोनेशिआ), मिस ऑड्रिना विलानोएवा बेसरल (मेक्सिको), मिस प्रियांका (श्रीलंका) आदी देशांचे दुतावास अधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चित्रपताका महोत्सवामागील शासनाची भूमिका मांडली. राज्य शासन चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून चित्रपटकर्मींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच मराठी चित्रपटांनी सातत्याने अनवट विषय हाताळले, वेगळे प्रयोग केले आणि प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. कोविड काळात निर्माण झालेल्या चित्रपटांना राज्य शासनाने विशेष अनुदान देऊन प्रोत्साहन दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
याप्रसंगी ‘चित्रपताका’च्या यंदाच्या पर्वाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून त्यांनी ‘चित्रपताका’ महोत्सव आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक स्वरूपात पोहोचावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती राज्य शासनाकडून केली जाते. त्याच धर्तीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून उत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलाकृतींनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सांस्कृतिक संवादाच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र व देशाच्या कला-संस्कृती-परंपरेची ओळख दृढ करण्यासाठी मराठी सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. त्यादृष्टीने याप्रसंगी उपस्थित विविध देशांतील दूतावास अधिकाऱ्यांना त्यांनी मराठी सिनेमाला त्यांच्या देशात अवकाश उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले. मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील तीन वर्षांत बेस्टच्या वाणिज्य विकासासाठी उपलब्ध जागांचा उपयोग मराठी सिनेमांसाठी विशेष चित्रपटगृहे उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बालचित्रपटांची दर्जेदार निर्मिती आणि त्यांचे योग्य वितरण व प्रदर्शन यासाठी विशेष योजनांची आवश्यकता अधोरेखित करत येत्या काळात सांस्कृतिक कार्य विभाग आणि महामंडळाकडून पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या संवेदनशील व विचारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात दिवंगत अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या योगदानाचे स्मरण केले. चित्रपट महोत्सवांनी आपल्या कलात्मक जडणघडणीत बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख करत समीक्षकांनी केलेले कौतुक, दिलेले प्रोत्साहन आणि त्यातून मिळालेली कलात्मक ऊर्जा यामुळे कलाकार म्हणून आपली वाटचाल समृद्ध झाल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत मराठी चित्रपटांच्या आशयवैभवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘चित्रपताका’सारखे महोत्सव महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
तर यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या की, चित्रपट हे विविध भाषा, संस्कृती आणि समाजांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. आशयघनता आणि नवनवीन प्रयोग ही मराठी चित्रपटांची महत्त्वाची वैशिष्ट्ये असून, त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या पर्वात ३३ चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून, ‘बुक टु स्क्रीन’ हा साहित्य व चित्रपट क्षेत्र यांच्यातील दुवा सांधणाऱ्या उपक्रमासोबत १५ हून अधिक संवादसत्रे महोत्सवात होणार आहेत. महोत्सवासाठी नोंदणी शुल्कातून जमा होणारी संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याचेही व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांनी प्रादेशिक भाषेतील चित्रपटांसाठी भव्य आणि एकभाषिक चित्रपट महोत्सव असण्याची गरज व्यक्त केली. त्यादृष्टीने ‘चित्रपताका’चे महत्त्व अधोरेखित करत आशयघन, प्रयोगशील आणि नवोदितांच्या मराठी चित्रपटांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न यंदाच्या पर्वात केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चित्रनगरीच्या कार्याची आणि सुविधांची माहिती देणाऱ्या ‘चित्रदर्शन’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाची सुरुवात ‘नादरंग’ या सांगीतिक कार्यक्रमाने झाली. तालमणी पं. मुकुंदराज देव, रोहित देव, सचिन नाखवा, चिराग कट्टी (सतार), गंधार भालेराव (बासरी) आणि शिवहरी रानडे (कीबोर्ड) यांनी सादर केलेल्या सुरेल वादनाने उपस्थितांची मने जिंकली. मिलिंद कुलकर्णी आणि मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
‘बंधू’च्या प्रदर्शनाने ‘चित्रपताका’ची उत्साहात सुरुवात
महोत्सवाची सुरुवात ‘बंधू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने करण्यात आली. उपेंद्र लिमये व जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन भावांमधील नातेसंबंध, प्रेम, संघर्ष, जिव्हाळा आणि त्याग यांची भावस्पर्शी कथा मांडतो. अद्याप अप्रदर्शित असलेल्या या सिनेमाचा आस्वाद घेण्याची संधी प्रेक्षकांना महोत्सवाच्या उद्घाटकीय सिनेमाच्या माध्यमातून यावेळी मिळाली. उद्घाटन सोहळ्यात ‘बंधू’ या उद्घाटकीय चित्रपटातील कलावंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण आशय, सर्जनशीलता आणि कलात्मक प्रयोगांचा उत्सव असलेला ‘चित्रपताका–२०२६’ हा महोत्सव १८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.















