औंध : राज्यातील प्रत्येक रुग्णाचे जीव वाचविणे शासनाचे कर्तव्य आहे, याकामी रुग्णवाहिका महत्वाची भुमिका लक्षात घेता रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी, गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्याकरिता या सेवांविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
‘उरो’ रुग्णालय औंध येथे १०२, १०४ आणि १०८ रुग्णवाहिका कॉल सेंटरला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कांदेवाड, सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उरो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत होसमणी, क्षयरोग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध देशपांडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुहास कोरे आदी उपस्थित होते.
श्री. आबिटकर म्हणाले, एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल. १०४ कॉल सेटंरद्वारे रुग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जात असल्याने ही सेवा गरजू नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी आहे, १०२ रुग्ण्वाहिका गरोदर मातांकरिता आशेचा किरण आहे, त्यामुळे रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांचा उपयोग घेतल्यानंतर त्यांना आधार वाटला पाहिजे, अशा प्रकारची सेवा देण्याचा प्रयतन् करावा, रुग्णवाहिका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना श्री. आबिटकर यांनी दिल्या.
जिल्हा रुग्णालयातील सुरु असलेल्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची बांधकामांची माहिती घेतली. सुरु असलेल्या कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करावे,याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशा सूचना श्री. आबिटकर यांनी दिल्या.
श्री. आबिटकर यांनी कॉल सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येणार प्रतिसाद, प्रतिसादाचा कालावधी, रुग्णांची स्थिती, खाटा उपलब्धता, रुग्णवाहिकेतील साहित्य, रुग्णवाहिका ट्रॅकिंग प्रणाली, वाहनचालकांबाबत माहिती, इतर विभागाशी असलेला समन्वय, संख्यात्मक विश्लेषण आदीबाबतची माहिती घेतली.
























