पुणे : फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर भाजपची भूमिका दुटप्पी असून, महापालिका प्रशासनाच्या कारभारातील निष्क्रियताही पुन्हा एकदा समोर आली आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
पुणे महानगरपालिकेत आज फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाचा विषय चर्चेला आला. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक या प्रश्नावर आंदोलन करताना दिसले. या परिसरात अतिक्रमणासाठी हप्ते घेतले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचे खुद्द भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनीही सांगितल्याचा दावा किर्दत यांनी केला.
दुसरीकडे, भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांनी फर्ग्युसन रोडवर बांगलादेशी नागरिकांकडून अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता, स्थानिक नगरसेवक भाजपचे आणि विधानसभेत आमदार सिद्धार्थ शिरोळे हा विषय उपस्थित करत असतानाही अतिक्रमणाचा प्रश्न कायम आहे. बांगलादेशी नागरिकांकडून अतिक्रमण होत असल्याचा दावा असेल, तर स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत ठोस भूमिका मांडायला हवी होती. सत्तेतील सर्व यंत्रणा एकाच पक्षाच्या हातात असताना अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे स्वतःचेच हसे करून घेण्यासारखे आहे, अशी टीका किर्दत यांनी केली.
बीएमसीसी रोड, फर्ग्युसन रोड, आपटे रोड आणि मॉडेल कॉलनी परिसरातील नागरिक या प्रश्नाबाबत सजग आहेत. दर सोमवारी अतिक्रमणविरोधी पथक येते, कारवाईची चर्चा होते आणि त्यानंतर पुन्हा अतिक्रमण सुरू होते. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखावा ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विशेष म्हणजे, महापालिकेत अतिक्रमणावर चर्चा सुरू असतानाच अतिक्रमण विभाग सक्रिय झाला. फर्ग्युसन रोडवरील फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कारवाई होणार असल्याचा निरोप मिळाल्याने त्यांनी तातडीने आपले स्टॉल आणि साहित्य हलवले. त्यानंतर दुपारी बरोबर दोन वाजता महापालिकेची कारवाईची वाहने फर्ग्युसन रोडवर दाखल झाली. मात्र, तोपर्यंत परिसरातील बहुतांश अतिक्रमणे हटवण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकारातून भाजपची दुटप्पी भूमिका आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. अतिक्रमणांवर खरोखरच कायमस्वरूपी कारवाई करायची आहे की केवळ दिखावा करायचा आहे, असा सवाल मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला.
















