औंध : औंध परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक ओपन जिममधील व्यायामाची अनेक उपकरणे सध्या खराब अवस्थेत असून काही उपकरणे वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना व्यायाम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे सदस्य नाना गोपीनाथ वाळके यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मा. सौ. इंद्रायणी करचे यांना लेखी निवेदन दिले आहे.औंध परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या सार्वजनिक ओपन जिममधील व्यायामाची उपकरणे तुटलेली असून अनेक उपकरणांची योग्य देखभाल होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या सुविधांचा नागरिकांना योग्य लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र, उपकरणांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे औंध क्षेत्रीय कार्यालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील सर्व सार्वजनिक ओपन जिमची प्रत्यक्ष पाहणी करावी, खराब व नादुरुस्त उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी, आवश्यकतेनुसार नवीन उपकरणे बसवावीत आणि भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियमित देखभालीचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी नाना वाळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेल्या ओपन जिमची योग्य देखभाल करून त्या पुन्हा सुस्थितीत सुरू कराव्यात, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
















