शिक्षण हे केवळ उद्योगांशीच नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांशीही जोडले गेले पाहिजे: चंद्रकांत दादा पाटील

पुणे : ‘राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, त्यावर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी शिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. प्रकल्प-समस्या आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजात जाऊन समस्या समजून घेत उपाय शोधण्यास प्रोत्साहित करते. आपले शिक्षण हे केवळ उद्योगांशीच नव्हे, तर समाजाच्या प्रत्यक्ष प्रश्नांशी जोडले गेले पाहिजे,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातर्फे आयसर पुणे येथे आयोजित ‘उच्च शिक्षणातील समस्या-आधारित शिक्षण’ या विषयावरील प्रादेशिक संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने सोलापूर येथील चौथ्या ‘रिजनल रिसर्च सिम्पोजियम ऑन प्रोजेक्ट अँड प्रॉब्लेम-बेस्ड लर्निंग’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे होत्या. आयआयटी रोपरचे संचालक प्रा. राजीव आहुजा विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते. डेन्मार्कमधील अलबोर्ग विद्यापीठाच्या युनेस्को पीबीएल सेंटरच्या संचालिका प्रा. क्झियानग्यून डू, विद्यापीठाचे संस्थापक-कुलगुरू डॉ. गोपाळकृष्ण जोशी आणि आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत याप्रसंगी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या पुढाकारातून ही महत्त्वाची परिषद होत आहे. “समस्या-आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचा शोध घेण्यास, एकत्र काम करण्यास आणि ज्ञानाचा व्यावहारिक वापर करण्यास प्रवृत्त करते. यातून रोजगार आणि सुजाण नागरिकत्वासाठी आवश्यक असलेले चिकित्सक विचार, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सांघिक वृत्ती हे गुण विकसित होतात. ही कौशल्ये रोजगाराबरोबरच जबाबदार नागरिक घडविण्यासाठीही आवश्यक आहेत.”

प्रा. स्वाती कराड चाटे यांनी समस्या-आधारित शिक्षणाचा शालेय स्तरावरही व्यापक अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. ‘उच्च शिक्षणात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत ज्ञानासोबतच संवादकौशल्यांची कमतरता जाणवते. विद्यार्थ्यांनी समाजातील समस्या ओळखून त्यावर चर्चा करावी आणि सामूहिकरीत्या उपाय शोधावेत. यातून त्यांचा आत्मविश्वास आणि संवादकौशल्य विकसित होण्यास मदत होईल,’ असे त्या म्हणाल्या.

See also  राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

प्रा. राजीव आहुजा यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांमध्ये प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज व्यक्त केली. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकांनी अध्यापनात नावीन्य आणून विद्यार्थ्यांना वर्गाकडे आकर्षित केले पाहिजे. इंटरनेटवर सहज उपलब्ध नसलेले ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. क्झियानग्यून डू यांनी समस्या-आधारित शिक्षण ही विविध ज्ञानशाखांना जोडणारी आणि समाजात अर्थपूर्ण बदल घडविणारी कार्यपद्धती असल्याचे सांगितले. डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कृष्णकेदार गुमास्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रा. रूपाली धामणे यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. प्रभा कासलीवाल यांनी आभार मानले.