संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे- बौद्ध जयंतीनिमित्‍त शहीद जवानांच्‍या कुटुंबियांसाठी एक लाखांचा धनादेश सुपुर्त

पुणे : युद्ध नको बुद्ध हवा, हा संदेश जगाला मिळणे आवश्‍यक आहे. युद्धाला अंत नसतो हे युक्रेन आणि रशियाच्‍या युद्धाच्‍या स्‍थितीवरून समजते. संवेदनामधूनच भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले. त्‍यांनी बुद्ध विचारांवर चालत शांततेचा पुरस्‍कार केला. शहीद जवानांच्‍या कुटुंबियांच्‍या संवेदनातूनच कार्यक्रमासाठी येणारा खर्च आर्मी रिलिफ फंडाला देण्याचा उपक्रम स्‍तुत्‍य आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी उद्यानात दरवर्षी बुद्धपौर्णिमेला भीम-बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी शहीद जवानांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमासाठी येणारा खर्च शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देऊन आपल्या सहवेदना व्यक्त करण्याचा संकल्प डॉ. धेंडे यांनी व्यक्त केला. त्‍यानुसार महार बटालियनच्‍या निवृत्‍त माजी सैनिकांकडे एक लाख रुपयांचा धनादेश आर्मी रिलीफ फंड नावाने सुपुर्द करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात डंबाळे बोलत होते.  

भंते नागघोष, भंते धम्मानंद, भंते प्रियदर्शी, भंते अंकुश माला आदी भिख्खुंनी त्रिसरण, पंचशील आणि धम्‍मदेसना दिली. या वेळी आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, सुवर्णा पवार, यशवंत शिर्के, विजय गायकवाड, विजय कांबळे, गजानन जागडे, नामदेव घाडगे, सोपान लभाणे, सुभाष कांबळे, अनिल ननावरे, मेजर रणपिसे, मालती धीवार, रजनी वाघमारे, कविता घाडगे, मंगला गमरे, महार बटालियनचे कॅप्टन पोळके, सुभेदार वानखेडे आणि सहकारी उपस्‍थिती होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिसरन, पंचशील ग्रहण करण्यात आले.  धम्मदेसना घेण्यात आली. या वेळी देशसेवेत भूमिका बजाविणाऱ्या महार बटालियन मधील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भंते संघाचे स्वागत करण्यात आला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्‍हणाले की, केंद्र आणि राज्‍य सरकारला आवाहन आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नागरिकांच्‍या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये मदत म्हणून दिले आहे. मात्र दुसरीकडे देशातील आपल्‍या सैनिकांना युद्धात वीरमरण आले. ते शहीद झाले की त्‍यांच्‍या कुटुंबियांना मात्र तुटपुंजी मदत दिली जाते. त्‍यामुळे शहीद झालेल्‍या वीर जवानांच्‍या कुटुंबियांना देखील ५० लाखांची मदत द्यावी, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. तसेच शहीद जवानांच्‍या कुटुंबियांची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

या वेळी उपस्‍थित भंतेकडून युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश देत असताना बुद्धाने शांतता व करुणाची शिकवण दिली आहे. परंतु स्वरक्षण करताना (स्वतःचे किंवा देशाचे) हिंसा करणे यात गैर नसते, हे उदाहरण देऊन तथागत गौतम बुद्धांचा खरा शांततेचा संदेश काय हे समजावून सांगितले.

See also  स्वराज्य यात्रेतून 'आप'ची 'महाराष्ट्र' मोहीम