पुणे : कर्जत भीमाशंकर येथील टोर्रेंट पम्प प्रकल्पामुळे बेसुमार वृक्षतोड होत असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करीत राजकीय पक्ष , पर्यावरण कार्यकर्ते , स्थानिक गावकरी आंदोलन करीत आहेत, आता हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्यासुद्धा महावितरणला तोट्याचा असून दीर्घकालीन नुकसान करणारा आहे व याच्यामुळे अतिरिक्त वीजदर बोजा सामान्य नागरिकणा सहन करावा लागेल असा दावा आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ह्या टोर्रेंट पॉवर आणि महावितरण मधील करारामुळे जुन्या एण्रोन एनर्जि करारप्रमाणे अवाच्यासवा पैसे मोजावे लागतील असा इशारा दिला आहे.
या वेळी आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी साईडोंगर एक आणि साईडोंगर दोन यांचा निम्न जलाशय सामायिक असल्यामुळे याचा जंगल, जैववैविधता आणि स्थानिकांवर होणारा एकत्रित परिणाम अभ्यासला गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ही वीज निर्मिती नसून साठवणूक आहे. याची कार्यक्षमता ७५% असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ५९ पंप साठवणूक प्रकल्प येणार असून त्यांची एकूण क्षमता ८१००० मेगावॉट असणार आहे. याशिवाय रासायनिक बॅटरी स्टोरेज प्रकल्प वेगळे असतील. एकूण देशाची पंप साठवणूक प्रकल्पाची गरज १ लाख मेगावॉट असणार आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसारच ही पंप स्टोरेज प्रकल्प क्षमता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अपेक्षित जरुरीपेक्षा जास्त आहे असेही त्यांनी म्हंटले. हा प्रकल्प प्रस्ताव तज्ञ (EAC) समितीपुढे २६ जून २०२३ आला असताना त्याचा खर्च १२०२४ कोटी दाखवण्यात आला होता. दोन महिन्यानंतर हे दोन वेगवेगळे प्रकल्प म्हणून प्रस्तुत करण्यात आले आणि त्यामध्ये हा खर्च ७५०० कोटीने वाढवून १९५९३ कोटी झाला व जमीन १०० हेक्टर ने वाढली.
२६सप्टेंबर २०२४ च्या करारानुसार रोज पाच तास याप्रमाणे वर्षाचे ३६५ दिवस म्हणजे वार्षिक १८२५ तासासाठी २५ टक्के सायकल तूट/लॉस सह ८३,९८,४००/प्रति मेगावॉट दर असेल. याचा अर्थ की साठवणुकीपोटी ४.६० रुपये प्रति युनिट खर्च असेल, यात अधिकचा इनपुट सौर ऊर्जेचा किमान दर २.२४ रुपये प्रमाणे धरल्यास महावितरण ला हा खरेदी दर प्रति युनिट रु ६.७७ ते ६.८० पडेल. हा दर सद्यस्थितीतील कमाल/उच्चतर आपत्कालीन मागणीच्या वेळेसच्या खरेदी दराएवढा आहे. विद्युत साठवणुकीसाठी टोरंट कंपनीला प्रकल्प गुंतवणूक परतावा साधारण नऊ वर्षांमध्ये मिळेल. असे असताना हा करार ४० वर्षासाठी केला गेला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे बहुतेक सर्व सौर ऊर्जेचे व पवन ऊर्जेचे खरेदी करार हे कमाल २५ वर्षाचे आहेत. असे असताना साठवणूक करार मात्र ४० वर्षाचा करणे हे तर्क विसंगत आहे असे त्यांनी संगितले.
आता सव्वा दोन रुपये पर्यंत दर खाली आला आहे. २५ वर्षानंतर हा दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. असे असताना विद्युत साठवणुकीच्या करारामुळे २५ वर्षानंतरही या करारानुसार वीज खरेदी करावी लागेल. याची आकडेवारी पहाता २५ वर्षानंतर हा प्रकल्प करार सरकारसाठी डोईजड होईल. तेव्हा ह्या करारामुळे ग्राहकावर अतिरिक्त बोजा पडेल. अशीच गंभीर चूक एन्रॉन प्रकल्प करारात झाली होती.
सौर ऊर्जा स्वस्तात साठवण्याचे बॅटरी आधारित इतर पर्याय विकसित होण्याची शक्यता आहे. परंतु वितरण व्यवस्थेत एकाधिकारशाही झाली किंवा असे दीर्घकालीन करार केल्यामुळे खरेदीदर हा अवाच्या सवा ठरल्यास ग्राहकाला मनमानीला सामोरे जावे लागेल. थोडक्यात सौर ऊर्जा खरेदी करार २५ वर्षाचे आणि त्याचे साठवून करार मात्र ४० वर्षाचे असे तर्क विसंगत आणि टोरेंट पॉवर ,जेएसडब्लू निओ एनर्जी, अदानी सारख्या कंपनीच्या फायद्याचे धोरण या फडणवीस सरकारने अवलंबले आहे.
या प्रकल्पात किती कायम रोजगार निर्मिती होणार आहे? ५००० रोजगार निर्मितीचे आकडे फसवणूक करणारे आहेत. कंपनी असा दावा करत नाही असे संगत वृक्ष लागवडीचा अनुभव अत्यंत विदारक असताना त्याचा आग्रह का? ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना, महाराष्ट्राचे वनक्षेत्र साडेसोळा टक्केपर्यंत कमी होत असताना हा प्रकल्प दीर्घकालीन फायदेशीर कसा ठरतो? टोरेंट पॉवर लिमिटेडच्या कर्जत/ भीमाशंकर प्रकल्पाबाबत सरकार दिशाभूल करते आहे असा दावा आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला.
या पत्रकार परिषदेत मुकुंद किर्दत यांचे सोबत आप चे सुभाष करांडे, शंकर थोरात, सुनील सवदी, निरंजन अडागळे, श्रीकांत भिसे उपस्थित होते.
















