पुणे: दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. आत्तापासूनच खेड्यापाड्यांमध्ये पाणी आणि चारा मिळवण्यासाठी गाई-म्हशी आदी जनावरे वणवण हिंडत आहेत. शेतीसाठी पाणी नाही. लोकांना पिण्यासाठी आणि वापरासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पण, शहरात मात्र वॉशिंग सेंटर्स आणि उंच इमारतींची बांधकामे यासाठी पाण्याचा मुबलक वापर होत असून पोलीस आणि महापालिका अधिकारी यांचे त्यावर नियंत्रण राहिले नाही.
महापालिकेने १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. त्याचवेळी पुण्यातील अनेक रस्त्यांवर दोन चाकी चार चाकी वाहने धुण्यासाठी असलेली वॉशिंग सेंटर्स बिनदिक्कतपणे चालू आहेत. वाहन मालकांना त्याचे भान नाही. महापालिकेने अशा वॉशिंग सेंटर्सवर कारवाई करून तिथे धुतली जाणारी वाहने जप्त करावीत, अशी असंख्य नागरिकांची मागणी आहे.
अनेक वॉशिंग सेंटर्स ही नगरसेवक तसेच भाई लोकांची आहेत. त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर महापालिकेला पोलीस खात्याची साथ मिळणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीत उंच इमारतींचे बांधकाम चालू आहे. त्या बांधकामांसाठी मुबलक पाण्याचा वापर चालू आहे.
सध्या महापालिका आयुक्त आणि अधिकारी अतिक्रमणे काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्याचा फायदा घेऊन अन्य अनेक अधिकारी पाण्याच्या होत असलेल्या गैर आणि अतिरिक्त वापराकडे डोळेझाक करत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे
















