माहुली (ता. खानापूर) येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ८ तास ठिय्या आंदोलन
संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीची यंत्रे फोडली; उद्यापासून जिल्ह्यात सर्वत्र एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार.
खानापूर (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’ला कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे. खानापूर तालुक्यातील माहुली येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आक्रमक विरोधामुळे मोजणी न करताच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सकाळी ९ वाजल्यापासून माहुली येथील मोजणीच्या ठिकाणी शेतकऱ्यांसह तब्बल ८ तास ठिय्या मांडून प्रशासनाची कोंडी केली. दिवसभरात उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अनेकदा मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर त्यांना नमते घ्यावे लागले.
सुपीक जमिनी महामार्गात जात असल्याने नागेवाडी, माहुली आणि भाग्यनगर परिसरातील शेतकरी कमालीचे आक्रमक झाले होते. मोजणीसाठी आलेल्या पथकाकडील मोजणीची यंत्रे (मशिन) संतप्त शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन ती जागेवरच फोडून टाकली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रमुख आंदोलकांची धरपकड आणि सुटका
मोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काल रात्रीपासूनच शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करत त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता दबाव आणि आंदोलन पाहता या सर्व पदाधिकाऱ्यांना सायंकाळी उशिरा सोडून देण्यात आले.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले कि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात वज्रमूठ आवळली असून, कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. उद्यापासून जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी प्रशासनाकडून मोजणी करण्याचा प्रयत्न होईल, त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन तीव्र विरोध करण्याचा निर्णय आजच्या आंदोलनानंतर घेण्यात आला आहे.















