पुणे, दि. २४ नोव्हेंबर : पुणे महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच इतर सार्वजनिक जागांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण १,५४,६२० चौरस मीटर क्षेत्रफळावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे :
१) औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय :
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत बांधकामे तसेच फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ५९,९०५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
२) कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय :
उंड्री चौक ते कडक नगर चौक या दरम्यान रस्त्यावरील तसेच फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ४८,८०० चौरस मीटर क्षेत्रफळ अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
३) धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय :
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काउंटर शेड तसेच फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमण व बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण १,७६५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
४) वानवडी क्षेत्रीय कार्यालय :
परिमंडळ कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ३३,००० चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
५) विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय :
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रस्ते, इमारतींचे फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनधिकृत मांडव व शेड निष्कासित करण्यात आले. या कारवाईमध्ये एकूण १,१५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
पुणे शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ, फ्रंट मार्जिन व सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या राहाव्यात, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच शहरातील नागरी सुविधांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने पुणे महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण निष्कासनाची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी सार्वजनिक जागांवर अनधिकृत अतिक्रमणे करू नयेत तसेच शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
















