शिवाजीनगर न्यायालयात भरदिवसा खूनाचा प्रयत्न ; प्रशांत जगताप यांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल; ‘पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही; गुन्हेगारांचे मनोबल वाढले’

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात भरदिवसा गोळीबार आणि चाकूने हल्ला करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गृहखात्याच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात दररोज ५०० ते ६०० पोलिसांचा बंदोबस्त असतो. असे असतानाही ५ ते ६ गुन्हेगार बंदुका आणि कोयते घेऊन न्यायालयाच्या आवारात घुसतात, एका व्यक्तीची हत्या करतात आणि पसार होतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. गृहखाते आपले काहीही वाकडे करू शकत नाही, असा विश्वास गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाला असल्याचे जगताप म्हणाले.

पुणे शहरात दररोज गोळीबार, कोयत्याने हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. मोकळ्या जागांवरील दारुड्यांचा आणि गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्यातही पोलिसांना अडचणी येत असल्याचे सांगत त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘पार्टटाइम गृहमंत्री, फुलटाईम प्रचारमंत्री’
देवेंद्र फडणवीस हे पार्टटाइम गृहमंत्री आणि फुलटाईम प्रचारमंत्री असल्याचा टोला लगावत जगताप म्हणाले की, अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जातो, दौऱ्याच्या दिवशी पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो; मात्र सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.‘पुणेकरांनो, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. २४ तास राजकारण, राजकीय बेरीज-वजाबाकी आणि षड्यंत्र यातच त्यांचा वेळ जात आहे. जनतेच्या जीवाची पर्वा असणाऱ्यांच्या हाती कारभार द्या,’ असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.

गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

See also  धर्मयुद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर, नीतीचा अनीतीवर, प्रेमाचा द्वेषावर प्रहार- राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे पहिल्या वारकरी संमेलनाचे उद्घाटन