आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील एसटी महामंडळाच्या जागेचा योग्य वापर, एसटी स्थानकाची दुरवस्था आणि कायमस्वरूपी एसटी सुविधांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीची आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असतानाही या जागेचा नियोजनबद्ध वापर होत नसल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात होता. यातील काही जागा पीएमपीएमएलच्या वापरासाठी देण्यात आली असून, उर्वरित जागेचा उपयोग करून एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी कायमस्वरूपी व सक्षम सुविधा निर्माण व्हाव्यात, अशी मागणी होत होती.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संजय घुंडरे-पाटील यांनी अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला. एसटी स्थानक परिसरात खड्डे पडून दुरवस्था झाल्यानंतर विविध माध्यमांनी या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर या समस्येची गांभीर्याने दखल घेत संजय घुंडरे-पाटील यांनी हा प्रश्न केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष मार्गी लावण्याचा निर्धार केला.
या अनुषंगाने परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन प्रश्न मांडण्यात आला. त्यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. पुढे प्रादेशिक विभागप्रमुख अरुण सिया यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाचे अधिकारी, आळंदी नगरपालिका, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, PMPL संचालक श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त यांच्या सहभागातून संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सर्वांच्या सहमतीने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी एसटी स्थानक परिसरातील मुरमीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षश्री प्रशांतदादा कुह्राडे, यांच्या शुभहस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी श्री माधव खांडेकर, माजी विरोधी पक्षनेते श्री डीडी भोसले-पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प श्री चैतन्य महाराज कबीर, ST महामंडळाचे पुणे विभागीय वाहतूक नियंत्रक श्री गोविंद जाधव, श्रीअजित वडगावकर, हभप.श्री बाळासाहेब शेवाळे, श्री दीपक काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरमीकरणाच्या कामाला सुरुवात होणे ही निश्चितच सकारात्मक बाब असली, तरी आळंदीसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीर्थक्षेत्रात येणाऱ्या लाखो वारकरी, भाविक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने एसटी स्थानकाचा प्रश्न व्यापक स्वरूपात सोडविणे आवश्यक आहे. उपलब्ध जागेचा योग्य वापर करून कायमस्वरूपी एसटी स्थानक, नियोजनबद्ध बस पार्किंग, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन यासाठी परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या सहकार्यातून पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती संजय घुंडरे-पाटील यांनी यावेळेस दिली.
प्रश्न उपस्थित करणे, त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रशासनाला कृती करण्यास प्रवृत्त करणे, यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात गती मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अंतिम उद्दिष्ट केवळ तात्पुरती डागडुजी नसून आळंदीच्या एसटी सुविधांचा कायमस्वरूपी विकास हेच असले पाहिजे.














