विद्यार्थ्यांमधील साहित्यिक घडवणारे “बालकुमार साहित्य संमेलन – २०२६”चे उद्घाटन

पुणे : विद्यार्थ्यांमधील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, अशा प्रतिभावान विद्यार्थी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने “बालकुमार साहित्य संमेलन २०२६” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे दिनांक २७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी हे दोन दिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज माजी सनदी अधिकारी तथा यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. शेखर गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरस्वती पूजन व दिवंगत लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी प्रास्ताविक सादर करत सर्वांचे स्वागत केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनीही आपली पुस्तके लिहिली आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात साहित्यिकांची अशी भव्य शिदोरी उपलब्ध आहे, या बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वांनाच ही शिदोरी अनुभवण्याची संधी मिळाली आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत. असा अभिनव उपक्रम राबवणारी पुणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांनीही उद्घाटन समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या साहित्य संमेलनाला मूर्त रूप देण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचेही आभार व्यक्त करत पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या बालकुमार साहित्य संमेलनास भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समिती सभापती श्री. विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक श्री. संतोष हराळे, बालकलाकार श्री. कबीर खंदारे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, सदस्य व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले आणि भाऊसाहेब कारेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

See also  दीड वर्षाच्या नील भालेवरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद