पुणे : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्तृत्वावर आकसापोटी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वक्तव्याचा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सारसबाग येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास असून, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रावहिनी पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचे आणि त्यांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांच्यासह महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.















