औंध येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकारातून औंध येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील अंगणवाडी हॉलमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट आयआयएमएस हॉस्पिटल, बाणेर आणि एच. व्ही. देसाई आय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले

.शिबिरात हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर, हाडांचे विकार, कॅन्सर, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा तसेच त्वचारोग आदी विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. याशिवाय नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि चष्मे वाटप करण्यात आले.

नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, धर्मादाय योजना, मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधी यांची माहिती देण्यात आली. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणारे ‘वयोवंदना कार्ड’ मोफत काढून देण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी नगरसेविका भक्ती अजित गायकवाड, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, अभिजीत सुभाषदादा गायकवाड, आनंद छाजेड आदी उपस्थित होते. आयोजकांनी सहभागी रुग्णालये, वैद्यकीय पथक आणि नागरिकांचे आभार मानले.

See also  यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटी शिष्टमंडळाची बैठक संपन्न