‘आकृती २०२५’ नाविन्यस्पर्धेला भारती विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, येथे ‘आकृती नाविन्यस्पर्धा २०२५’ या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे सादरीकरण डसॉल्ट सिस्टीम्स या जागतिक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थिनींसाठी आयोजित या कार्यक्रमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात नाविन्याचा आणि प्रेरणेचा उत्सव साजरा केला.

कार्यक्रमाला डसॉल्ट  सिस्टेम्सतर्फे मा. श्री. सूरज गजबिये, आरआरडी कॅटिया गुणवत्ता तज्ज्ञ आणि मा. श्री. शुभम अरोरा, उद्योग प्रक्रिया सल्लागार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. श्री. गजबिये यांनी विद्यार्थिनींना एक खुमासदार प्रश्न विचारून संवादाची सुरुवात केली, “अभियांत्रिकी म्हणजे केवळ गणना नसून ती कल्पकतेची गोष्ट आहे, यावर कोणाचा विश्वास आहे?” या प्रश्नाने सभागृहात उत्सुकतेची लाट उसळली आणि विद्यार्थिनींनी आपले विचार उघडपणे मांडण्यास सुरुवात केली. ही चर्चा केवळ तांत्रिक ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थिनींच्या सर्जनशील क्षमतेला साद घालणारी ठरली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी डसॉल्ट सिस्टेम्सच्या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी नमूद केले की, “आकृतीसारख्या स्पर्धा आमच्या विद्यार्थिनींना केवळ कल्पनाशक्तीला चालना देत नाहीत, तर त्या नाविन्य, शाश्वतता आणि सामाजिक जाणिवांच्या मांडणीद्वारे वास्तवातील समस्यांवर उपाय शोधण्यास सक्षम करतात.” त्यांनी महाविद्यालयातील शिक्षणाच्या सर्जनशील व नेतृत्वक्षम दृष्टिकोनावरही भर दिला.

‘आकृती २०२५’ ही केवळ एक स्पर्धा नसून ती एक जागतिक नवप्रवर्तन मोहीम आहे, हे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. यामध्ये जगभरातून १४०० हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे विषय ‘शाश्वत वाहतूक’, ‘हरित ऊर्जा’ आणि ‘ग्राहक-केंद्री उत्पादने’ यांवर आधारित असून विद्यार्थिनींना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून स्थानिक तसेच जागतिक प्रश्नांवर उपाय सुचवण्याची अनमोल संधी दिली जाते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी मागील वर्षीच्या विद्यार्थिनींच्या काही प्रेरणादायी प्रकल्पांची उदाहरणे सादर केली. घरगुती पाणीसाठ्याच्या स्वच्छतेच्या उपाययोजना, दिव्यांगांसाठी हलकी व्हीलचेअर, तसेच लहान गावांसाठी सौरऊर्जेवर आधारित पिण्याचे पाणीपुरवठा केंद्र अशा अनेक कल्पक संकल्पनांची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवर मांडलेल्या समस्या जागतिक स्तरावरही प्रभाव टाकू शकतात. त्यांनी अधोरेखित केले की, दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या अगदी छोट्या समस्याही जर नीट निरिक्षणपूर्वक हाताळल्या, तर त्या मोठ्या नवप्रवर्तनाच्या संधी बनू शकतात.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘आकृती’मुळे विद्यार्थिनींना केवळ माहिती मिळाली नाही, तर त्यांनी प्रेरणा घेतली, आत्मविश्वास वाढवला आणि आपल्या कल्पकतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याची उमेद मिळवली. “आकृतीमुळे तुम्ही आता ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ‘झळकू’ शकता,” हा संदेश प्रत्येक विद्यार्थिनीच्या मनात उमटलेला स्पष्ट जाणवला. आता ही ‘आकृती’ केवळ एक रचना नव्हे, तर पुढील यशस्वी अभियंता घडविण्याचा आराखडाच ठरावा, हीच अपेक्षा! *या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. प्राणोती काळे यांनी केले.*

See also  एमआयटी एडीटी’च्या 'कंजूस' ने गाजवला भारत रंग महोत्सव