प्रभागनिहाय टेंडर पद्धत बंद करा; संपूर्ण प्रभागाचे एकत्रित बजेट जाहीर करा; टेंडर प्रक्रियेतील कथित संगनमताची चौकशी करण्याची मागणी; उज्ज्वल केसकर

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा उपभागनिहाय टेंडर काढण्याची पद्धत बंद करून संपूर्ण प्रभागाचे एकत्रित बजेट व विकासकामांचे नियोजन करण्यात यावे. तसेच टेंडर प्रक्रियेत कथित संगनमत व ठेकेदारांवर दबाव आणण्याच्या प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेत आरक्षणाच्या दृष्टीने अ, ब, क, ड असे उपभाग करण्यात आले आहेत. मात्र, याच उपभागांच्या आधारे स्वतंत्र टेंडर काढले जात असल्याची बाब चुकीची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रभाग क्रमांकाच्या अ, ब, क, ड उपभागांसाठी स्वतंत्रपणे पाणीपुरवठा, रस्ते व अन्य विकासकामांची निविदा काढण्याऐवजी संपूर्ण प्रभागासाठी एकत्रित नियोजन आणि बजेट असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

टेंडर भरण्यासाठी ठेकेदारांना दबाव?
काही एजंटांकडून संबंधित उपभागांतील टेंडर भरू नये, यासाठी ठेकेदारांना फोन करून दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात चार उपभागांसाठी स्वतंत्र एजंट कार्यरत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. या आरोपांमध्ये तथ्य असल्यास हा गंभीर प्रकार असून, त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एकत्रित बजेट व पारदर्शक खर्चाची मागणी
प्रत्येक प्रभागाला दिले जाणारे संपूर्ण बजेट एकत्रित ठेवावे आणि त्याचा विनियोग कुठे करायचा, हे संबंधित प्रभागातील चारही नगरसेवकांनी सामूहिकपणे ठरवावे. ‘विविध ठिकाणी कामे करणे’ या शीर्षकाखालील बजेट काढून टाकावे, तसेच प्रभागनिहाय बजेट आणि खर्चाचा तपशील गुगल किंवा सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना निधीचा नेमका विनियोग समजू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

बजेट वर्गीकरण करताना कायदेशीर बाबी तपासा
काहीजण बजेट विकत असल्याच्या तक्रारीही समोर येत असल्याचा उल्लेख निवेदनात आहे. बजेटचे वर्गीकरण मंजूर करण्यापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (MMC Act) तरतुदी तपासाव्यात. महापालिकेच्या उत्पन्नाच्या प्रमाणातच विनियोग व वर्गीकरण करता येते का, यासह संबंधित कायदेशीर बाबींची पडताळणी करावी. कोणताही ठराव मंजूर करताना त्याची कायदेशीर वैधता तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांनी पार पाडावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

See also  मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

महापालिका आयुक्तांनी प्रत्येक विकासकामाची तपासणी आणि छायाचित्रण करण्याबाबत दिलेल्या आदेशांचे स्वागत करण्यात आले असून, त्यांची कठोर अंमलबजावणी केल्यास अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पुणेकर नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा योग्य, पारदर्शक आणि जबाबदारीने विनियोग व्हावा, यासाठी आयुक्तांनी ठाम भूमिका घेऊन संबंधित पद्धतीत सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.