पिंपरी : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील विविध पक्षांच्या बैठकांचे सूत्र सुरू आहे. यात आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी एक कोअर कमिटी जाहीर केली होती. या कोअर कमिटीची बैठक ज्येष्ठ नेते आझम पानसरे व शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी आझमभाई पानसरे यांनी सांगितले की, कोअर कमिटीच्या माध्यमातून निवडणूक नियोजनाला आम्ही सुरुवात केली आहे. सर्वप्रथम निवडणुकीला उमेदवार म्हणून इच्छुक असणाऱ्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर संघटने बाहेरील इतर ज्या इच्छुकांना पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवायची आहे अशा सगळ्यांचे अर्ज आम्ही मागवत आहोत. अशा इच्छुकांना पक्षाशी संपर्क करता यावा यासाठी विधानसभानिहाय दोन-दोन प्रतिनिधींची आणि शहर पातळी वर दोन प्रतिनिधींची आम्ही निवड केली आहे. इच्छुक उमेदवारांची माहिती जमा झाल्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत.
गेले पाच- सात वर्ष पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत अतिशय भोंगळ कारभार सुरू असून आता तो बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ज्या शरद पवार साहेबांनी हे शहर उभे करण्यात आणि घडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली त्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली आहे.
सदर बैठकीला कोअर कमिटीचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. तर काही पदाधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने ते कल्पना देऊन अनुपस्थित होते. एकदा प्राथमिक तयारी झाली की खासदार अमोल कोल्हे, रोहितदादा पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांचा मेळावा आम्ही घेणार आहोत.अशी माहिती कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे*यांनी दिली. तत्पूर्वी मार्गदर्शनासाठी उद्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे या पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक चिंचवड गाव येथील विरंगुळा केंद्र येथे होणार आहे.
विधानसभा निहाय निवडणूक अर्ज स्वीकृती प्रतिनिधी
शहर: तुषार कामठे, देवेंद्र तायडे
भोसरी विधानसभा: काशिनाथ जगताप, इम्रान शेख
पिंपरी विधानसभा: सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण
चिंचवड विधानसभा: सुनिल गव्हाणे, तुषार कामठे
वरील पदाधिकाऱ्यांकडे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी दिली.






















