सुस : सुसगाव परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन सोयीसुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ५ कोटी ६३ लाख १२ हजार रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकहितार्थ उपक्रमांचा शुभारंभ आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते पारखे फार्म, सुसगाव येथे उत्साहात पार पडला.
या निधीतून परिसरातील रस्त्यांची कामे, विद्युत रोहित्रांची उभारणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्यात येणार आहे. या विकासकामांमुळे सुसगाव परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
या अंतर्गत महादेव नगर ते शिवालय सोसायटीपर्यंत रस्ता तयार करणे, भगवती नगर, धनश्री पार्क आणि गावठाण परिसरातील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच रावीनगर येथे १०० केव्हीए, तर महादेव नगर आणि भगवती नगर येथे प्रत्येकी ६३० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यात येणार आहेत. विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांसाठी आसनव्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, कै. गोविंद (नाना) निम्हण यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्याचा लोकहितकारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांच्या सहभागातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका मयुरी कोकाटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















