विठूरायाच्या ओढीने पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकर्यांसाठी ‘आरोग्य वारी’

मुंबई :– आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरकडे पायी निघणार्या लाखो वारकर्यांमधे महिला वारकर्यांची संख्या ही लक्षणीय असते. या महिला वारकर्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून ‘आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

याबाबत बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी व वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून लाखो वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षी चालत असतात. यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. २० – २१ दिवस महिला जवळपास दोनशे किमीचा पायी प्रवास करत असतात. यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे. यात
१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.
३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
५. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा.
६. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे. अशी आयोगाची भुमिका आहे.

आरोग्य वारी उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत दुरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपसचिव दिपा ठाकूर यांचेसह निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा, उपायुक्त सातारा जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापुर, अतिरिक्त आय़ुक्त सोलापुर महानगरपालिका आदी उपस्थित होते. सातारा, पुणे, सोलापुर या तीन ही जिल्ह्याच्या प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

See also  पुणे मेट्रोच्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावाप्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश

पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारकर्यांसाठी १२९० फिरती स्वच्छतागृहे व १२ शाळांमधे न्हाणीघराची व्यवस्था केली आहे. डाँक्टरांच्या पथकात स्त्री रोग तज्ञांची सुविधा उपलब्ध असून ३० ठिकाणी निवारा कक्ष उभारण्यात आले आहेत. हिरकणी कक्ष, सँनिटरी पँड मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांमधे महिला वारकर्यांसाठी न्हाणीघर, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून दुचाकी वर तैनात आरोग्य पथकाची सोय करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या या दुचाकी लगेच ओळखता येतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, २१ ठिकाणी हिरकणी कक्ष सातारा जिल्हा प्रशासनाने तयार केले आहेत. सोलापुरात दर दिड किमी वरच्या निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डाँक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

या सर्वांचा आढावा घेत महिलांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे निदेश आयोगाच्या अध्यक्षांनी तीन ही जिल्ह्याच्या प्रशासनला दिले आहेत. विठूरायाच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालणार्या महिला वारकर्यांकरिता सेवा सुविधा उपलब्ध करुन देत त्यांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षेची दक्षता घेतल्यास खर्या अर्थाने महिलांची वारी निर्मल वारी होईल असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.