ऐश्वर्य कट्ट्यावर रंगल्या मातीतल्या गप्पा! नावलौकिक केलेल्या माजी पैलवान व गुरूवर्य यांचा सन्मान

पुणे : ऐश्वर्य कट्टा हा सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण होता. कारण कुस्तीचे फड जिंकून मातीशी इमान राखणारे, लहान मुलांना घडवून मातीशी नाळ जपणारे आणि कष्टांतून वर येऊन मातीशी नाते सांगणारे रथी महारथी आजच्या कट्ट्याला आवर्जून उपस्थित होते. या सगळ्यांच्या संगतीने त्यांची वाटचाल समजून घेताना कट्ट्यावर लाल-काळ्या मातीतल्या गप्पा मनसोक्त रंगल्या!…


ऐश्वर्य कट्ट्याचे मानकरी होते, ट्रीपल महाराष्ट्र केसरी प्राप्त कुस्तीपटू आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पै.विजय चौधरी, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै.तात्यासाहेब भिंताडे, महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पै.विजय बराटे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,वस्ताद पंकज हरपुडे ,पैलवान हनुमंत नांगरे उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांचा शिंदेशाही पगडी, शाल, मोत्याची माळ, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या सर्वांनी आपापली वाटचाल उलगडली आणि आपल्या जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग सांगितले.

विजय चौधरी यांनी आपल्याला वडिलांनी कसे कुस्तीमध्ये घडवले याचे अनेक रंगतदार किस्से सांगितले. तात्यासाहेब भिंताडे यांनी कशी कष्टातून वाटचाल केली हे सांगितले. विजय बराटे यांनी शिक्षणसंस्थेच्या आणि तालमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत हे सांगितले तर अमोल नलावडे यांनी विकासकामांमध्ये स्वत:ला झोकून देत मातीशी असणारी नाळ कशी जपली हे सांगितले.

याप्रसंगी कुस्तीगीरांच्या दैनंदिन सुख सुविधांसाठी आप्पा रेणुसे मित्र परिवारातर्फे 51 हजार रुपये देणगी देण्यात आली.

आजच्या या रंगलेल्या कट्ट्याला माझ्यासह वरिष्ठ पत्रकार पराग पोतदार, विलासराव भणगे, रवींद्र संचेती, युवराज रेणुसे, अ‍ॅड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे, शंकरराव कडू, सर्जेराव शिळीमकर, आकाश वाडघरे, मंगेश साळुंखे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर आणि अप्पा रेणुसे मित्र परिवारातील सर्वजण उपस्थित होते.

See also  आरंभ हौसिंग सोसायटीचा सामाजिक उपक्रमशील गणेशोत्सव साजरा